१४ वनराई बंधारे घालत गावात पाणी बचावाचा संदेश
ओटवणे(प्रतिनिधी ) ओटवणे गावात “उमेद ” अभियानातर्गत शिवम प्रभाग संघ माजगाव यांच्या मार्गदर्शनाखाली , उत्कर्ष ग्रामसंघ ओटवणे मधील स्वयंसहाय्यता गटातील सर्व महिलांनी एकत्र येत गावात आदर्शवत काम केले असून गेल्या ४, ५ दिवसात १४ वनराई बंधारे घालत “पाणी अडवा पाणी जिरवा,हा संदेश दिला आहे.
यावर्षी पावसाने मारलेली दडी पडलेला दुष्काळ आणि भविष्यातील पाणी टंचाईच सावट लक्षात घेता वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरवून पाण्याची पातळी वाढविण्याचा प्रयत्न संपूर्ण जिल्ह्यात सुरु असून यात महिला वर्गाचा मोठा वाटा,सहभाग पाहायला मिळतो. तीच प्रचिती माजगाव प्रभागातील ओटवणे येथिल महिलानी दिली जिथं गरज आहे तिथे महिला वर्गानी एकत्र येत बंधाऱ्यांची बांधणी केली आणि भविष्यातील येणाऱ्या पाणी टंचाई पासून वाचण्यासाठी आतापासूनच पाणी बचाव, दैनंदित कामात पाणी जपून वापरण्याचा संकल्प केला. त्यांनी केलेल्या या आदर्श कामाचं गावातून कौतुक होत आहे.या आदर्श कामात गावातील सर्व स्वयंसहाय्यता गटातील महिलावर्ग,उमेद अभियानातील ग्राम सखी, अंगणवाडी सेविका, मदतनीस आशा स्वयंसेविका यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.













