रामचंद्र आरेकरांच्या शैक्षणिक व प्रशासकीय सेवेचा गौरवपूर्ण सन्मान!

३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मुख्याध्यापक पदावर सेवानिवृत्त

चिपळूण (वार्ताहर) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाची गोडी लावून तो विषय सोप्या पद्धतीने शिकविणारे, उत्तम प्रशासकीय कौशल्य आणि पालक, विद्यार्थी व सहकाऱ्यांशी सुसंवाद साधणारे आर. डी. आरेकर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त चिपळूण तालुक्यातील ओवळी-नांदिवसे आर. आर. शिंदे माध्यमिक विद्यालय येथे भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
आरेकर यांनी आपल्या शैक्षणिक सेवेची सुरुवात अवघ्या ५०० रुपये मानधनावर केली. सन १९९१ ते २०१५ या कालावधीत त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल, तिवरे येथे शिक्षक म्हणून सेवा बजावली. त्यानंतर २०१५ ते २०२१ या कालावधीत श्री आर. आर. शिंदे माध्यमिक विद्यालय, ओवळी-नांदिवसे येथे शिक्षक म्हणून, तर २०२१ ते २०२६ या कालावधीत मुख्याध्यापक म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. गरजू व गरीब विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शाळेत विविध शासकीय योजना सुरू करणे, शाळेसाठी आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे, पालकांशी सुसंवाद राखणे आणि शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत सातत्य राखणे या कार्यांत त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले. त्यांनी १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली. या सत्कार समारंभाला संस्थाध्यक्ष मा.बळीराम शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून तर परशुरामराव शिंदे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. शाळा समितीचे चेअरमन एल. के. शिंदे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. यावेळी शाळा समितीचे सदस्य दिनेश शिंदे, भरत शिंदे, दीपक शिंदे, राज्य पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापक संजय चव्हाण, टी. एस. पाटील, पी. एम. पाटील, मुख्याध्यापक सुभाष पाटील, सौ. शारदा बेंडाळे, पतपेढीचे माजी चेअरमन बी. एस. चौगुले, व्हाइस चेअरमन विजय वणवे यांच्यासह विविध शाळांतील शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच कुटुंबातील सदस्य एम.डी.आरेकर, आप्पासो बेवलेकर, सर्व बंधू भगिनी, सौ व श्री. सचिन आरेकर, भाचे आनंदा आरेकर, कुंडलिक बेलवळेकर, मुलगा रोहन आरेकर, डॉ.स्नेहल शिंदे-आरेकर उपस्थिती होती. सहकारी सौ. उज्वला लोखंडे, संतोष चव्हाण, किशोर आंब्रे, विजय जांभळे, सुधाकर पवार या सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडला.
सूत्रसंचालन व आभार किशोर आंब्रे यांनी केले. तसेच आरेकर सरांचे आजी-माजी विद्यार्थी, पालक, हितचिंतक आणि दोन्ही गावांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी सरांच्या शैक्षणिक, सामाजिक व प्रशासकीय कार्याचा गौरव केला. दीर्घकाळ शिक्षणक्षेत्रात योगदान देणाऱ्या आरेकर सरांच्या सेवानिवृत्तीप्रसंगी उपस्थितांनी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद आणि सुखसमृद्धीच्या शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या आरेकर सरांच्या सेवाकार्याचा गौरव करणारा हा सोहळा सर्वांसाठी संस्मरणीय ठरला.