रत्नागिरी : प्रतिनिधी
शहरानजीकच्या भाटे दर्गा स्टॉप येथे चालत्या गाडीला अचानकपणे आग लागून 1 लाखाचे नुकसान झाल्याची घटना मंगळवार 13 ऑक्टोबर रोजी रात्री 8.15 वा.सुमारास घडली. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झालेली नसून याबाबत शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत मोहम्मद जैब बक्तीयार सोमेस्कर (33,रा.गाझी मोहल्ला साखरी नाटे,राजापूर) यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार, मंगळवारी रात्री ते आपल्या ताब्यातील व्होल्क्सवॅगन कार (एमएच-08-आर-8588) घेउन धन्वंतरी हॉस्पिटल ते नाटे असे जात होते. ते भाटे येथील दर्गा स्टॉपजवळ आले असता त्यांच्या कारला अचानकपणे आग लागली. या आगीत गाडीपूर्णपणे जळून खाक झाली असून मोठे नुकसान झाले आहे. याबाबत शहर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याबाबत अधिक तपास महिला पोलिस हवालदार साळवी करत आहेत.













