Breaking : खेडमध्ये स्मार्ट बाजारसमोरील दुकानाला मध्यरात्री आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने आग आटोक्यात

खेड | प्रतिनिधी :

खेड शहरातील भरणे रोडवरील एसटी डेपोसमोर असलेल्या स्मार्ट बाजार परिसरात गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ वाजून १८ मिनिटांनी आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवली.

प्राथमिक माहितीनुसार, दुकानाबाहेरील विद्युत जोडणी असलेल्या ठिकाणी मोबाईल चार्जरमुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या ठिकाणी भाजीचे दुकानही होते.

घटनेची माहिती मिळताच खेडच्या नगराध्यक्षा सौ. माधवी बुटाला, नगरसेवक सुनील दरेकर आणि भूषण चिखले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली.

या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी खेड नगरपरिषदेचे फायरमन श्याम देवळेकर, दीपक देवळेकर, वाहनचालक गजानन जाधव आणि सहायक फायरमन सूरज शिगवण यांनी तत्परतेने काम केले. अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमुळे आग विझवण्यात यश आले. या घटनेत किती नुकसान झाले, तसेच अन्य काही हानी झाली का, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.