सात महिने रक्कम स्वतःकडे ठेवल्याचा आरोप
चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीच्या घरपट्टी, पाणीपट्टी आणि वीजकर वसुलीतून जमा झालेल्या १ लाख ४३ हजार ६९ रुपयांच्या रकमेचा अपहार केल्याच्या आरोपावरून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शिरगावात खळबळ उडाली आहे. ग्रामस्थांकडून वसूल केलेली ही रक्कम ग्रामपंचायतीच्या बँक खात्यात जमा करणे आवश्यक असताना ती सुमारे सात महिने स्वतःकडे ठेवल्याचा आरोप संबंधितांवर करण्यात आला आहे.
याप्रकरणी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १२६/२०२६ अन्वये भारतीय दंड विधान कलम ४०८ व ३४ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपींमध्ये धनंजय दत्ताराम सोलकर (३३), दिनेश दत्ताराम धागडे (४२) आणि श्रीकृष्ण गंगाराम कदम (५०, तिघेही रा. शिरगाव, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) यांचा समावेश आहे. याप्रकरणी नीता निलेश शिंदे (३३, रा. पाटीलवाडी, शिरगाव, ता. चिपळूण) यांनी फिर्याद दिली आहे. नेमके प्रकरण काय? पोलिसांत दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत शिरगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ग्रामस्थांकडून घरपट्टी, पाणीपट्टी, वीजकर आदी करांची वसुली करण्याची जबाबदारी धनंजय सोलकर, दिनेश धागडे आणि श्रीकृष्ण कदम यांच्यावर सोपविण्यात आली होती. या कामादरम्यान ग्रामस्थांकडून वसूल केलेली एकूण १ लाख ४३ हजार ६९ रुपयांची रक्कम ग्रामपंचायतीच्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शाखा शिरगाव येथील बचत खात्यात जमा करणे आवश्यक होते.
मात्र, त्यांनी ती रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा न करता ती स्वतःच्या फायद्यासाठी सुमारे सात महिने स्वतःजवळ ठेवून वापरण्यात आली. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निधीचा अपहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. शासकीय नियमांच्या उल्लंघनाचाही आरोप या प्रकरणात महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या ग्रामपंचायतींच्या आर्थिक व्यवहारांसंदर्भातील शासन परिपत्रकांचाही उल्लेख करण्यात आला आहे. संबंधित परिपत्रकांनुसार ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता झाल्याचा तसेच ग्रामपंचायतीच्या निधीचा अपहार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यानुसार याप्रकारणी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात त्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












