टेरव तांदळेवाडी येथील घटना
चिपळूण (वार्ताहर) : तालुक्यातील टेरव तांदळेवाडी येथे शेडच्या कामावरून झालेल्या वादातून एकाने फावड्याने तिघांना मारहाण केल्याची घटना रविवार दि. २२ नोव्हेंबर दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या मारहाणीत तिघे जखमी झाले असून याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिवाजी नारायण म्हालीम (४५, व्यवसाय वेल्डर, राहणार टेरव तांदळेवाडी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार शिवाजी म्हालीम व अन्य साक्षीदार गावात शेडचे काम करीत असताना संशयित आरोपी संजय सिताराम म्हालीम (४७, राहणार टेरव तांदळेवाडी) याठिकाणी आला, तुम्ही अंगणात शेड का बांधत आहात असे सांगत त्याने वाद घातला या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. यावेळी संजय म्हालीम याने तेथे असलेले फावडे उचलून शिवाजी म्हालीम यांच्या हातावर आणि दंडावर तसेच काशिनाथ म्हालीम यांच्या दंडावर आणि थोबाडावर मारहाण करून दुखापत केली. या घटनेत शिवाजी नारायण म्हालीम आणि काशीराम म्हालीम हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातून प्राप्त झालेल्या वैद्यकीय माहितीच्या आधारे पोलिसांनी फिर्यादीचा जबाब नोंदवून घेतला. त्यानंतर संजय सिताराम म्हालीम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.













