मंडणगड, प्रतिनिधी : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेने एकत्रितपणे पुढाकार घेऊन जलसंवर्धन करण्याची गरज आहे. पावसाचे वाहून जाणारे पाणी वनराई बंधाऱ्यांच्या माध्यमातून अडवून त्याचा उपयोग भूजल पातळी वाढविण्यासाठी करावा, असे आवाहन रत्तानिगीरी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.अस्मिता केंद्रे यांनी तुळशी केले. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी तुळशी या गावी बंधारे मोहिमेत त्या सहभागी झाल्या होत्या. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर व्हावा असा उल्लेख करताना, पावसाअभावी शेतीचे झालेले नुकसान आणि पाण्याची खालावणारी पातळी याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. पिकांच्या लोंब्यांमध्ये दाणे पूर्णपणे भरले नसल्याची प्रत्यक्ष परिस्थिती पाहिल्यानंतर दुष्काळाची तीव्रता लक्षात आल्याचे त्यांनी सांगितले. यंदा पाणीपातळी झपाट्याने खालावत असल्याने एप्रिल-मे महिन्यात जाणवणारी पाणीटंचाई फेब्रुवारीपासूनच जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात वनराई बंधारे बांधण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ग्रामपंचायतींनीही उपलब्ध निधीतून पाणी संवर्धनाच्या कामांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्यातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन छोटे-छोटे वनराई बंधारे उभारावेत. अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांनी समन्वयाने काम केल्यास पाणीटंचाईच्या संकटावर मात करता येऊ शकते. पाणी वाचविणे म्हणजे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी केलेला महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे, असेही त्यांनी नमूद केले. सण-उत्सवांच्या काळातही जलसंधारणाच्या कामात सहभागी होणाऱ्या ग्रामस्थांचे त्यांनी कौतुक केले. गावागावांवरील पाणीटंचाईचे संकट दूर व्हावे आणि भविष्यातील अन्नधान्याच्या प्रश्नावरही मात करता यावी, यासाठी आंबेमातेच्या आणि ग्रामदेवतेच्या चरणी प्रार्थना करत असल्याचे त्यांनी सांगितले. वनराई बंधार्यांचे तालुक्याचे लक्ष पुर्ण करणार- पाणी टंचाईचे संभाव्य संकट लक्षात घेवुन तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीना त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावात किमान १५ ते २० वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट दिले असुन या कामी सर्व प्रशासकीय यंत्रणा मदत करणार ऑक्टोबर महिना संपण्यापुर्वी हे उद्दिष्ट पुर्ण करण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी राजेंद्र आंधळे यांनी सांगीतले कार्यक्रमास विस्तार अधिकारी पवन गोसावी, तुळशी गावाचे शिक्षक, विद्यार्थी, महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. फोटो ओळी -तुळशी येथे आयोजीत कार्यक्रमात वनराई बंधारा बांधताना मान्यवर













