संघर्ष क्रीडा मंडळाचा शैलेश येडगे महाराष्ट्राच्या संभाव्य कबड्डी संघात!

 राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी राज्याच्या कबड्डी शिबिरात निवड

चिपळूण (प्रतिनिधी) : संघर्ष क्रीडा मंडळाचा होतकरू कबड्डीपटू कु. शैलेश येडगे याने आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर कबड्डी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पालघर-विरार येथे आयोजित ५३ व्या कुमार गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०२६ मधील कामगिरीच्या बळावर त्याची महाराष्ट्र राज्याच्या कुमार गट कबड्डी संघाच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत निवड झाली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य कबड्डी संघाच्या प्रशिक्षण शिबिरासाठी त्याची निवड झाल्याने संघर्ष क्रीडा मंडळाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना शैलेश येडगे याने आपल्या खेळातील कौशल्य आणि मेहनतीच्या जोरावर ही महत्त्वपूर्ण संधी मिळवली. त्याच्या या यशामुळे संघर्ष क्रीडा मंडळाच्या खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, त्याच्या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.शैलेशच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संघर्ष क्रीडा मंडळाच्या वतीने त्याचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे पदाधिकारी, माजी कार्यकारिणी सदस्य, मंडळाचे जुने खेळाडू तसेच सध्या मंडळाकडून खेळणारे सर्व खेळाडू उपस्थित होते. उपस्थितांनी शैलेशचे अभिनंदन करत त्याच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. कबड्डी हा मेहनत, चपळता, संघभावना आणि जिद्द यांचा संगम असलेला खेळ आहे. या खेळात सातत्यपूर्ण सराव आणि शिस्तीच्या जोरावर यश संपादन करता येते. शैलेशने मिळवलेली ही संधी त्याच्या पुढील क्रीडा कारकिर्दीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आगामी काळात त्याने राज्य संघात स्थान मिळवून राष्ट्रीय स्तरावर रत्नागिरी जिल्ह्याचे आणि संघर्ष क्रीडा मंडळाचे नाव उज्ज्वल करावे अशी अपेक्षा यावेळी मान्यवरांनी व्यक्त करण्यात आली. शैलेश येडगे याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत असून, आगामी स्पर्धांमध्येही त्याने अशीच चमकदार कामगिरी करावी, अशा शुभेच्छा संघर्ष क्रीडा मंडळाच्या वतीने देण्यात आल्या.