पाणलोस येथे मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर संपन्न!

शिवसेना तालुकाप्रमुख विनायक बाईत यांच्या हस्ते शुभारंभ ; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवण | प्रतिनिधी : ग्रामपंचायत मठबुद्रुक व आरोग्य उपकेंद्र मठबुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच शिवसेना मालवण तालुकाप्रमुख तथा उपसरपंच विनायक बाईत आणि निलेश बाईत यांच्या संकल्पनेतून पाणलोस येथे मोफत आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. विनायक बाईत यांच्या हस्ते या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. सरपंच मोहन वेंगुर्लेकर यांच्या यशस्वी नियोजनातून शिबिर पार पडले. या उपक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोफत आरोग्य व नेत्र तपासणीचा लाभ घेतला.

 

ग्रामीण भागातील नागरिकांना अश्या आरोग्य सेवा उपक्रमातून आरोग्य तपासणी करून संभाव्य आजारांचे निदान होण्यास मदत व्हावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. नागरिकांना आरोग्याबाबत जागरूक करण्यासोबतच त्यांना आवश्यक तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

 

आमदार निलेश राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना तालुकाप्रमुख विनायक बाईत व सहकारी सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत. समाजहिताच्या कार्यातून नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या गरजांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न या उपक्रमांच्या माध्यमातून केला जात आहे.

 

या शिबिरावेळी शिवसेना तालुकाप्रमुख विनायक बाईत, सरपंच मोहन वेंगुर्लेकर, निलेश बाईत, ग्रामपंचायत सदस्या लीना बाईत, आशा सेविका आकांक्षा बाईत, आरोग्य सेवक नाटेकर, आरोग्य विभागातील डॉक्टर व कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

ग्रामीण नागरिकांना आरोग्य तपासणीच्या सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.