जल्लोषी, भक्तीमय अन् जगदंबेच्या जयघोषी वातावरणात नवदुर्गेच विसर्जन

नवीन कुर्ली वसाहतीच्या देवीला विर्सजन वेळी भाविकांकडून पाणवलेल्या डोळ्यांनी निरोप !

नवदुर्गा युवा मंडळ नवीन कुर्ली यांच्या सार्वजनिक नवरात्रोत्सवाच्या नियोजनाचे सर्वांकडून कौतुक !

फोंडाघाट ( कुमार नाडकर्णी ): फोंडाघाट नवीन कुर्ली येथे भवानी मैदानावर नवदुर्गा युवा मंडळ (रजि.) आयोजीत सार्वजनिक नवरात्रौत्सव देवी दुर्गामातेची प्रतिष्ठापना करुन सलग २४ व्या वर्षी शारदीय नवरात्ररंभ घटस्थापना ते विजयादशमी दसरा या कालावधीत विविध सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक उपक्रमाने कार्यक्रम साजरा करुन आज नवदुर्गाचे विसर्जन ढोलताशा पथकांचा गगनभेदी आवाज, पारंपारिक फुगडी नृत्य, तसेच गरबा आणि दांडियाच्या तालावर थिरकणारी युवाई, फटाक्याची आतषबाजीने विसर्जन मिरवणुक नवीन कुर्ली- फोंडाघाट बाजार पेठ- मारुती वाडी अशा मिरवणुकीने दुर्गामातेचे विसर्जन करण्यात आले.

नवदुर्गा युवा मंडळ (रजि.) या मंडळाकडुन गेली २४ वर्षे नवीन कुर्ली येथे सार्वजनिक नवरात्रौत्सवाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात येतो. या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रम त्यामध्ये मुलां- मुलींकरीता वेशभुषा स्पर्धा, रेकॉर्ड डान्स, विविध फनी गेम, महिलांकरीता हळदीकुंकू,खेळ पैठणीचा, फुगडी नृत्य, गरबा नृत्य तसेच भजन, हरिपाठ, किर्तन यासारखे धार्मिक कार्यक्रम व रक्तदान शिबीर यासारखे सामाजिक उपक्रम राबवले होते. फोंडाघाट दशक्रोषीमध्ये नवसाला पावणा-या या देवी दुर्गामातेच्या उत्सवात पालकमंत्री ना.नितेश राणे सहीत राजकीय, सामाजिक, व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी देवी दुर्गामातेचे दर्शन घेतले होते.

विजयादशमी दस-यानंतर या देवीचे विर्सजन करण्यात आले. जगदंबेचा जयघोष, भक्तीगीतांची धून तसेच,भक्तीमय व आस लागलेल्या वातावरणात विर्सजन मिरवणुक सोहळ्यास नवदुर्गा युवा मंडळाचे सर्व पदाधिकारी, तसेच नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे पदाधिकारी, गावातील बहुसंख्य ग्रामस्थ, महिला- युवा उपस्थित होते. या विसर्जन शिस्तबद्ध मिरवणुकीमध्ये दुर्गामातेच्या मुर्तीची सजावट, पुरुषांचे एका कलर मधील पांढरा सदरा ड्रेस कोड व महिलांचे एका कलरचे साडी ड्रेस कोड लक्षवेधी होते. विसर्जन सोहळ्यास भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती. उशीरापर्यत चाललेल्या मिरवणुकीनंतर रात्री फोंडाघाट मारुती मंदिर नजीक उगवाई नदीवर भाविकांच्या पाणावलेल्या डोळ्यांनी दुर्गामातेचे विसर्जन करण्यात आले.