घाटीवळे व करंजारी येथे चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री पाच ठिकाणी घरफोडी

ऐवज केला लंपास; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

देवरूख (प्रतिनिधी)

संगमेश्वर तालुक्यातील घाटीवळे व करंजारी गावात चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे. एकाच रात्री तब्बल पाच ठिकाणी घरफोडी करून‌ ऐवज लंपास केला आहे. दरम्यान, या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामीण भागातील घरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एकाच रात्री पाच ठिकाणी झालेल्या घरफोडीच्या घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास करून चोरट्यांचा लवकरात लवकर छडा लावण्याचे आव्हान आता देवरूख पोलीसांसमोर आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, घाटीवळे मुस्लिम वाडीतील अब्दुल रहमान फोडकर, इकबाल उमर फोडकर, अब्दुल मज्जिद शिरगावकर या तिघांच्या बंद घरांना चोरट्यांनी लक्ष केले आणि कुलपे तोडून घरातील काही ऐवज लंपास केला आहे. घाटीवळे गावातील चोऱ्या करून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असणाऱ्या करंजारी गावातील चंद्रकांत शिवराम भुर्के, बाबा वळंजु यांच्या घरांकडे चोरट्यांनी मोर्चा वळवला. महत्त्वाचे म्हणजे ही दोन्ही घरे एकदम हायवेला लागून असून भुर्के यांचे घर बंदच होते परंतु बाबा वळंजु हे काही निमित्त बाहेर गेलेले असताना चोरांनी डल्ला मारला. या दोन्ही घरातून सुमारे ५२ हजाराचा ऐवज लंपास असल्याचे समजते.

विशेष म्हणजे बाबा वळंजु यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला मात्र आपले काम साधून पुन्हा याच कडी कोंड्याला दुसरे कुलूप लावून पोबारा केला. या प्रकाराची खबर साखरपा पोलीसात देण्यात आली असून या प्रकाराने घाटीवळे व करंजारी गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरे एकमेकांपासून काही अंतरावर असल्याने रात्रीच्या वेळी संशयास्पद हालचाली सहज लक्षात येतीलच असे नाही. अशा परिस्थितीचा फायदा घेत चोरटे घरफोडी करत असल्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. घाटीवळे आणि करंजारी येथील घटनांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.