चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील पिंपळी खुर्द येथील मधलीवाडी हनुमान मंदिर परिसरात एका बंद घराचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कमेसह एकूण १ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. घरमालक सहकुटुंब बाहेरगावी गेलेले असताना ही घरफोडी झाली असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पिंपळी खुर्द मधलीवाडी येथील सेवानिवृत्त नागरिक राम शिवराम कदम (७० वर्षे) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
राम कदम हे २२ ऑक्टोबर रोजी सकाळी आपल्या कुटुंबासह कल्याण येथे गेले होते. दरम्यान, २२ ऑक्टोबर रोजी सकाळी सात ते २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात या कालावधीत घर बंद असल्याचा गैरफायदा अज्ञात चोरट्यांनी घेतला. चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप व कडी- कोयंडा कोणत्यातरी धारदार अथवा लोखंडी हत्याराने तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर पहिल्या मजल्यावरील बेडरूममध्ये असलेल्या लोखंडी कपाटाचा दरवाजा उचकटून लॉकरमधील ऐवज चोरून नेला. या घरफोडीत चोरट्यांनी कपाटातील ५० हजार रुपये किमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी, किंमत ५० हजार रुपये किमतीच्या प्रत्येकी पाच ग्रॅमच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, दहा हजार रुपये किमतीची चांदीची गणेशमूर्ती, मोदक व पैंजण, तसेच २० हजार रुपयांची रोकड असा एकूण १ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. असे तक्रारीत म्हटले आहे. त्यांचे कुटुंब कल्याण येथून घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. कदम यांच्या फिर्यादीवरून चिपळूण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिपळूण पोलीस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत पुढील तपास करीत आहेत.













