‘पहिला कथासंग्रह असूनही बाळबोधपणाचा लवलेश नाही’ — वृंदा कांबळी
वेंगुर्ले : दाजी नाईक
आपल्या आजूबाजूची माणसं, त्यांची बदलती रूपं आणि काळाच्या ओघात बदलत जाणारे नातेसंबंध यांचे मर्मभेदी चित्रण प्राजक्ता आपटे यांच्या ‘मुकी मैत्रीण’ या कथासंग्रहात पाहायला मिळते. हा त्यांचा पहिलाच प्रकाशित कथासंग्रह असला, तरी त्यात कुठेही बाळबोधपणा जाणवत नाही. अलंकारिक शब्दांचा मारा न करता ओघवत्या भाषेत आणि उत्तम कथाबीजांच्या आधारे साकारलेल्या या कथा प्रत्येक वाचनात नवे पैलू उलगडून वाचकाला थक्क करतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका वृंदा कांबळी यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा २०२६-२७ चा आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद शाळा क्र. २, वेंगुर्ला येथील मुख्याध्यापिका प्राजक्ता प्रशांत आपटे यांच्या ‘मुकी मैत्रीण’ या पहिल्याच कथासंग्रहाचे प्रकाशन रविवारी (दि. २५ ऑक्टोबर) वेंगुर्ला येथे साई डिलक्स हॉल येथे उत्साहात झाले. किरात ट्रस्टने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला राजकारण, उद्योग, साहित्य, कला, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते रघुवीर तथा भाई मंत्री, वेंगुर्ल्याचे नगराध्यक्ष दिलीप गिरप, ज्येष्ठ साहित्यिक वृंदा कांबळी, निवृत्त गटशिक्षणाधिकारी रमेश पिंगुळकर, नगरसेवक प्रशांत आपटे, चित्रकार सुनील नांदोसकर, लेखिका प्राजक्ता आपटे आणि साप्ताहिक ‘किरात’च्या संपादक सीमा मराठे उपस्थित होते.
पुढे बोलताना वृंदा कांबळी यांनी आपल्या मनोगतात ‘आनंदयात्री’च्या प्रवासातील एका सदस्याचा कथासंग्रह प्रकाशित होणे ही आनंदाची बाब असल्याचे सांगितले. कथा म्हणजे नेमके काय, लघुकथा आणि कादंबरी यांतील फरक, तसेच कथाबीज आणि वास्तव यांचा कथेशी असलेला संबंध यांविषयी त्यांनी विवेचन केले. या संदर्भात प्राजक्ता आपटे यांच्या लघुकथांचे कौतुक करून त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीला शुभेच्छा दिल्या.
उद्योजक भाई मंत्री यांनी प्राजक्ता आपटे यांना शुभेच्छा देताना प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याला योग्य दिशा मिळण्यासाठी कोणीतरी मार्गदर्शक आणि सहाय्यभूत ठरत असते, असे सांगितले. “माझ्या आयुष्यात वि. स. खांडेकर यांच्यासारख्या व्यक्तींचे योगदान लाभले, म्हणून आज मी उद्योजक म्हणून तुमच्यासमोर उभा आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या जडणघडणीतील मार्गदर्शकांचे महत्त्व अधोरेखित केले. ‘मुकी मैत्रीण’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ मनाला भावणारे असून, कोकणातील निसर्गाचे सौंदर्य प्राजक्ता यांच्या लेखणीतून कथांच्या रूपाने उतरले आहे, असेही ते म्हणाले. ‘मुकी मैत्रीण’ हा शब्दांच्या पलीकडच्या नात्यांची गुंफण करणारा अप्रतिम कथासंग्रह असल्याचे सांगत, वाचनातूनच आपली जडणघडण झाली असल्याचे भाई मंत्री यांनी नमूद केले. वेंगुर्ला तालुक्यातील प्रत्येक नगरवाचनालयात हे पुस्तक पोहोचावे, या हेतूने त्यांनी प्राजक्ता आपटे यांना २५ हजार रुपयांची देणगी दिली.
लेखिका प्राजक्ता आपटे यांनी आपल्या मनोगतातून लेखनप्रवासातील आठवणींना उजाळा दिला. आई-वडील आणि कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळे लेखनप्रवासाला बळ मिळाल्याचे सांगताना, आपली पहिली कथा ‘किरात’ दिवाळी अंकातून प्रसिद्ध झाल्याची आठवण त्यांनी आवर्जून सांगितली. त्यावेळी ‘किरात’चे तत्कालीन संपादक श्रीधर मराठे यांनी त्यांच्या लेखनाचे कौतुक करून, “तू खूप छान लिहिते आहेस, अशीच लिहीत राहा. जसे सुचेल तसे लिही. तू लिहीत राहशील, तशी तुझ्या लेखनात प्रगल्भता येत जाईल,” असा प्रेमळ सल्ला दिला होता. त्या प्रोत्साहनातून सुरू झालेला लेखनप्रवास आजही सीमा मराठे आणि शशांक मराठे यांच्या सहवासात कौटुंबिक जिव्हाळ्याने सुरू असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
आपलेही एखादे पुस्तक प्रकाशित व्हावे, अशी सुप्त इच्छा आपण प्रशांत आपटे यांच्याजवळ व्यक्त केली होती, असे प्राजक्ता यांनी सांगितले आणि २२ ऑक्टोबर या आपल्या वाढदिवशी प्रशांत आपटे, सुनील नांदोसकर सर, सीमा मराठे आणि शशांक मराठे यांनी कोणताही सुगावा लागू न देता, आतापर्यंत लिहिलेल्या कथांचे संकलन करून ‘मुकी मैत्रीण’ हा कथासंग्रह प्रकाशित करून दिला. ही अनपेक्षित भेट आपल्यासाठी अतिशय मोलाची असल्याचे त्यांनी सांगितले. ही केवळ पुस्तकाची भेट नसून, आपल्या लेखनावर प्रेम करणाऱ्या आणि सातत्याने प्रोत्साहन देणाऱ्या माणसांनी दिलेली भावनिक भेट आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
या कथासंग्रहाचे मुखपृष्ठ साकारलेले चित्रकार सुनील नांदोसकर यांनी मुखपृष्ठनिर्मितीमागील विचार स्पष्ट केला. कथासंग्रहाचे मुखपृष्ठ तयार करताना त्यातील अनेक कथांचा विचार करावा लागतो. एखाद्या कथेला शीर्षक म्हणून महत्त्व मिळालेले असले, तरी त्या कथेवर आधारित चित्र साकारताना इतर कथांचेही भान राखणे आवश्यक असते. कथांचा आशय, त्यांची धाटणी, तसेच त्यातील परिसर आणि वातावरण लक्षात घेऊन चित्रशैली निवडावी लागते. ‘मुकी मैत्रीण’ या कथेसाठी विशिष्ट चित्रशैली निवडण्यामागेही हाच विचार असल्याचे त्यांनी सांगितले. या संग्रहातील इतर कथाही त्याच परिसराशी आणि वातावरणाशी नाते सांगणाऱ्या असल्याने मुखपृष्ठाची चित्रशैली ठरवताना संपूर्ण कथासंग्रहाच्या आशयाचा विचार केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
निवृत्त गटशिक्षणाधिकारी रमेश पिंगुळकर यांनी प्राजक्ता आपटे यांच्या बहुगुणसंपन्न व्यक्तिमत्त्वाचे कौतुक केले. ज्या शिक्षकांचा सहवास मुलांना आवडतो आणि ज्यांच्याभोवती मुले आनंदाने वावरतात, ते शिक्षक उत्तम असतात, असे सांगत त्यांनी शाळांना भेटी देत असताना प्राजक्ता यांच्याभोवती मुलांचा असाच घोळका पाहिल्याची आठवण सांगितली. उत्तम शिक्षिका असण्याबरोबरच त्या चांगल्या अभिनेत्रीही आहेत. राज्य नाट्यस्पर्धा आणि दशावतार यांसारख्या कलाप्रकारांत त्यांनी सहभाग घेतला आहे, असे नमूद करून त्यांनी प्राजक्ता यांच्या कलागुणांचे कौतुक केले. तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद मराठी शाळेत ‘मुकी मैत्रीण’ हे पुस्तक पोहोचावे, यासाठी आवश्यक पुस्तके खरेदी करून ती शाळांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपण स्वीकारत असल्याचे त्यांनी जाहीर केले.
वेंगुर्ल्याचे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी ‘किरात’च्या साहित्यविषयक उपक्रमाचे अभिनंदन करून प्राजक्ता आपटे यांच्या हातून अशीच नवनवीन पुस्तके लिहिली जावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली. वेंगुर्ल्याच्या साहित्यपरंपरेचा उल्लेख करताना जयवंत दळवी, मधुसूदन कालेलकर, मंगेश पाडगावकर आणि वि. स. खांडेकर यांसारख्या नामवंत साहित्यिकांची आठवण त्यांनी करून दिली. या साहित्यिकांप्रमाणेच प्राजक्ता आपटे यांचाही साहित्यप्रवास यशस्वीपणे पुढे जावा, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी प्राजक्ता आपटे यांना बक्षीस म्हणून पाच हजार रुपये, तर ‘किरात ट्रस्ट’ला देणगी म्हणून पाच हजार रुपये जाहीर केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सीमा मराठे यांनी केले. निवेदन शशांक मराठे यांनी केले, तर नगरसेवक प्रशांत आपटे यांनी आभार मानले.













