रत्नागिरी :
रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे मेर्वी येथे विहिरीत पडलेल्या रानडुकराची वनविभागाने सुखरूप सुटका केली आहे. रानडुकराला विहिरीतून बाहेर काढल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्याची प्राथमिक तपासणी करण्यात आली. रानडुकराची प्रकृती उत्तम असल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
मंगळवार, दिनांक २७ ऑक्टोबर रोजी मौजे कुर्धे मेर्वी येथील श्रीमती शुभदा महेश पाध्ये यांच्या मालकीच्या विहिरीत रानडुक्कर पडल्याची माहिती कासवमित्र प्रदीप डिंगणकर यांनी वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
यावेळी विहिरीतील पाण्यात रानडुक्कर पोहत असल्याचे निदर्शनास आले. विहिरीची गोलाई सुमारे १५ फूट, खोली ४५ फूट, तर पाण्याची पातळी १५ फूट असल्याचे आढळून आले. परिस्थितीचा अंदाज घेत वनविभागाच्या पथकाने पाण्यात पिंजरा सोडला आणि रानडुकराला सुरक्षितपणे पिंजऱ्यात जेरबंद केले.
त्यानंतर हरचेरी येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून रानडुकराची प्राथमिक तपासणी करण्यात आली. रानडुक्कर सुस्थितीत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
ही कार्यवाही रत्नागिरी-चिपळूण विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरीजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
यावेळी परिक्षेत्र वन अधिकारी विक्रम गुरव, वनरक्षक शर्वरी कदम, महेश धोत्रे, कासवमित्र प्रदीप डिंगणकर, सर्पमित्र वरद हळबे आणि आरआरटीचे इशांत खानोलकर उपस्थित होते.
वनविभाग आणि वन्यजीव मित्रांच्या तत्परतेमुळे विहिरीत पडलेल्या रानडुकराला जीवदान मिळाले.













