चिपळूण (प्रतिनिधी) : गुहागर-कराड मार्गावरील रामपूर बैकरवाडी येथे एस.टी बस आणि इर्टिगा कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. हा अपघात मंगळवार दि. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ७.१५ वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून, याप्रकरणी इर्टिगा चालकाविरुद्ध चिपळूण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रमेश निळकंठ ढाले (३७, रा. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर; सध्या एसटी डेपो, गुहागर) हे एस.टी बस क्रमांक एमएच २० बीएल ३५८७ घेऊन गुहागरहून चिपळूणच्या दिशेने जात होते. रामपूर बैकरवाडी येथे आले असता, चिपळूणच्या दिशेकडून येणाऱ्या इर्टिगा कार (क्र. एमएच ०२ जीएच ६७३०) च्या चालकाने रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता भरधाव वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवून विरुद्ध दिशेला येत एस.टी बसच्या उजव्या बाजूला समोरून जोराची धडक दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या धडकेत दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. याप्रकरणी इर्टिगा चालक किरण सुरेश गोताड (३६, रा. हनुमान टेकडी, रूम क्रमांक २०६, सांताक्रूझ पूर्व, मुंबई) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











