थोड्याच वेळात सुरू होते रत्नागिरी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा व टंचाई नियंत्रणाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय अपेक्षित

रत्नागिरी: प्रतिनिधी 

रत्नागिरी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा आज, गुरुवार दिनांक २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता नूतन इमारतीमधील समिती सभागृहात नगराध्यक्ष श्रीमती शिल्पा प्रशांत सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. या सभेत शहरातील विकासकामे आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित विविध विषयांवर चर्चा होणार असून, यामध्ये विशेषतः पाणीपुरवठा आणि भावी पाणी टंचाईच्या नियोजनासंदर्भातील विषय चर्चेसाठी पटलावर आले आहेत.  

पाणीपट्टी दर सुधारणा, विहिरींची दुरुस्ती आणि टंचाई नियंत्रणाचे विषय चर्चेच्या केंद्रस्थानी

आज होणाऱ्या या सर्वसाधारण सभेच्या पटलावर आलेल्या विषयांमध्ये पाणीपुरवठा विभागाशी निगडित असलेल्या तीन प्रमुख विषयांवर विशेष चर्चा होणार आहे:

 विषय क्रमांक ९३ – पाणीपट्टी दरांमध्ये सुधारणा: रत्नागिरी नगर परिषदेच्या पाणीपट्टी दरांमध्ये सुधारणा करण्याबाबत आलेला कार्यालयीन अहवाल चर्चेसाठी ठेवण्यात आला आहे.  

 विषय क्रमांक ९४ – सार्वजनिक विहिरी व बोअरवेलची दुरुस्ती: रत्नागिरी नगर परिषदेच्या स्वतःच्या मालकीच्या असलेल्या सार्वजनिक विहिरी आणि बोअरवेल यांची दुरुस्ती करून पिण्याचे पाणी सुरळीत ठेवण्याबाबतच्या अहवालावर या सभेत निर्णय घेतला जाणार आहे.  

 विषय क्रमांक ९५ – संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर कठोर पावले: आगामी काळातील संभाव्य पाणी टंचाईच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून, शहरातील जलतरण तलाव (Swimming Pool) तसेच वाहने धुण्याचे सर्व्हिसिंग रॅम्प यांना देण्यात आलेली नळ कनेक्शन तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्याबाबतचा प्रस्ताव सभेच्या पटलावर चर्चेसाठी आला आहे.  

या सर्वसाधारण सभेत वरील पाणी विषयक प्रस्तावांसह प्रभाग ९ मधील जुन्या भाजी मंडईस “श्री नवलाई देवी जुनी भाजी मंडई” असे नाव देणे, शहरातील १४ बस थांब्यांना व उद्यानांना नावे देणे, तसेच तारांगणात ‘The Moon Mission – India’s Journey to the Moon’ हा नवीन शो सुरु करण्याबाबतच्या विविध विषयांवरही सविस्तर चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतले जाणार आहेत.