गजर भजनाचा की कल्लोळ वादाचा ?

कुडाळ तालुक्यातील एका तिरंगी डबलबारीचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि ते पाहून भजन हा भक्तीचा गजर की वादाचा कल्लोळ असे प्रश्न सर्वसामान्य रसिकांना पडू लागले, कुठे नेऊन ठेवली आम्ही आमची भजन संस्कृती? आणि याला जबाबदार कोण? असं प्रश्न या निमित्ताने पुन्हा विचारले जाऊं लागले…

 

भजन म्हणजे केवळ टाळ-मृदंगाच्या तालावर गायले जाणारे गीत नव्हे; भजन म्हणजे मनाची भक्ती, विचारांची शुद्धता आणि जीवनाला दिशा देणारी संतविचारांची साधना!

संत तुकाराम महाराजां या भजनातील नामस्मरणाचा महिमा सांगताना म्हणाले,

*नामसंकीर्तन साधन पै सोपे ।*

*जळतील पापे जन्मांतरीची ॥*

पण अलीकडे झालेल्या या तिरंगी बारीत व्यासपीठावर जे घडलं ते भजनी परंपरेचा, संस्कृतीला गालबोट लावणारे ठरलं अन् यावर तिव्र शब्दात प्रतिक्रिया उमटू लागल्या..

भजन परंपरेची प्रतिष्ठा, कलाकारांची जबाबदारी, आयोजकांची भूमिका आणि सोशल मीडिया बद्दलची आचार संहिता या बद्दल पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ…

भजन ही केवळ मनोरंजनाची कला नाही, तर ती कोकणच्या सांस्कृतिक जीवनाचा आत्मा आहे. संतविचारांचा प्रसार, भक्तीची अनुभूती, समाजप्रबोधन आणि लोकसंस्कृतीचे संवर्धन करणारी ही परंपरा अनेक पिढ्यांपासून कोकणच्या मातीत रुजलेली आहे. मंदिरातील टाळ-मृदंगाचा निनाद असो, हरिनाम सप्ताहातील भक्तिरस असो किंवा डबलबारी भजनातील वैचारिक जुगलबंदी असो, प्रत्येक प्रकारामागे उभा आहे तो एक समृद्ध सांस्कृतिक वारसा..

मात्र, अलीकडे पार पडलेल्या येथील तिरंगी डबलबारी भजनाच्या कार्यक्रमातील काही आक्षेपार्ह संवाद आणि कथित अशोभनीय प्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आले. या प्रकारामुळे भजन क्षेत्रात चर्चा सुरू झाली.

या घटनेकडे केवळ त्या तिरंगी बारीतील बुवांच्या मधील वाद म्हणून पाहणे योग्य ठरणार नाही. हा विषय संपूर्ण भजन संस्कृतीच्या प्रतिष्ठेशी, कलाकारांच्या सामाजिक जबाबदारीशी आणि भावी पिढीसमोर आपण कोणता आदर्श ठेवतो, याच्याशी संबंधित आहे.

डबलबारी म्हणजे बुद्धिमत्तेची लढाई, व्यक्तिमत्त्वाची नाही!

डबलबारी भजन ही कोकणच्या भजन परंपरेतील एक वैशिष्ट्यपूर्ण कलापद्धती आहे. दोन बुवांमधील प्रश्नोत्तरे, अभंगांची निवड, संतवाङ्मयाचा आधार, शास्त्रशुद्ध विवेचन, विनोदबुद्धी आणि समयसूचक प्रत्युत्तर यामुळे डबलबारी रंगतदार होते. मात्र, या रंगतदारपणाच्या नादात भाषेचे भान सुटता कामा नये. प्रतिस्पर्ध्याला त्याच्या अभ्यासाने निरुत्तर करणे ही कलात्मकता; पण वैयक्तिक टीका, अश्लील शब्दप्रयोग, शिवीगाळ आणि अवमानकारक वक्तव्ये ही कलात्मकता नव्हे. पार्श्व भाग दाखवणे एकमेकांचा माईक ओढणे , उर्मट , बेताल भाषा वापरण कितपत योग्य? याचा विचार केला जावा..

समोरच्याला ज्ञानाला उत्तर देता आले नाही म्हणून त्याच्या व्यक्तिमत्त्वावर प्रहार करणे, हा त्या बुवांचा नाही तर तो भजन कलेचा पराभव आहे. डबलबारीत विनोद असावा, उपरोध असावा, कोटी असावी; परंतु त्याला संस्कारांची चौकट असणे आवश्यक आहे.भजनातील खरी रंगत अभंगांच्या अर्थाने वाढली पाहिजे, अपमानाच्या शब्दांनी नव्हे!

*कलाकार मोठा की कला मोठी?*

भजन क्षेत्रात प्रत्येक कलाकाराचे योगदान महत्त्वाचे आहे. एखाद्या बुवाला मोठा चाहता वर्ग असेल, एखाद्याच्या आवाजाला लोकप्रियता असेल, तर एखाद्याच्या अभ्यासपूर्ण विवेचनामुळे त्याला मान मिळत असेल. परंतु या सर्वांपेक्षा मोठी आहे ती आपली भजन परंपरा.

भजनी बुवानी हे लक्षात ठेवले पाहिजे की तो व्यासपीठावर केवळ स्वतःचे प्रतिनिधित्व करत नसतो, तर आपल्या गुरुंचे, आपल्या सांप्रदायाचे आणि भजन संस्कृतीचे प्रतिनिधित्व करत असतो. त्याच्या बोलण्यावरून नव्या पिढीची भजनाविषयीची धारणा तयार होत असते. त्यामुळे कलाकाराचे वर्तन, भाषा आणि विचार यामध्ये जबाबदारी भावना असणे गरजेचे आहे.

केवळ कार्यक्रम घेणे नव्हे, तर भजन संस्कृतीची प्रतिष्ठा जपणे हि सुध्दा डबलबारी भजनाचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या आयोजकांची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. दोन किंवा तिन, चार नामवंत भजनी बुवांना एकाच व्यासपीठावर आणणे, त्यांच्यासाठी आर्थिक नियोजन करणे, ध्वनिव्यवस्था आणि रसिकांची व्यवस्था करणे एवढ्यापुरती आयोजकांची भूमिका मर्यादित असूच शकत नाही. कारण आयोजकांनी उभारलेले व्यासपीठ हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून भजन संस्कृतीचे सार्वजनिक व्यासपीठ असते. या कार्यक्रमाला हजारो रसिक उपस्थित असतात. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक आणि लहान मुलेही असतात. त्यामुळे व्यासपीठावरून होणाऱ्या प्रत्येक वक्तव्याचे सामाजिक परिणाम लक्षात घेणे आवश्यक आहे.

जाहीर पणे अश्लील पणे बोलणं शिव्या, बेताल भाषा वापरण या साठी संबंधित व्यक्तीवर कलम २९४ (IPC) / कलम २९६ (BNS) कलम ४९९ आणि ५०० (IPC) / कलम ३५६ (BNS) अंतर्गत कारवाई होऊ शकते. हे लक्षात घेतले पाहिजे

विशेषतः डबलबारी भजनामध्ये कलाकारांमधील वैचारिक स्पर्धा रंगताना भाषेची मर्यादा ओलांडली जात असेल, वैयक्तिक टीका किंवा आक्षेपार्ह संवाद होत असतील, तर आयोजकांनी केवळ प्रेक्षक म्हणून त्याकडे पाहणे योग्य नाही. कार्यक्रमाचे स्वरूप बिघडू नये यासाठी आवश्यक त्या वेळी हस्तक्षेप करणे ही त्यांची नैतिक आणि सांस्कृतिक जबाबदारी आहे.

आयोजकांनी कार्यक्रम निश्चित करतानाच संबंधित भजनी बुवांशी संवाद साधून कार्यक्रमाची मर्यादा, स्वरूप आणि अपेक्षित सांस्कृतिक दर्जा स्पष्ट करायला हवा. कार्यक्रमात आयोजकांची समन्वयकाची भूमिका प्रभावी असावी. आक्षेपार्ह प्रकार घडल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता संयमाने परिस्थिती हाताळण्याची व्यवस्था असावी.

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केवळ गर्दी जमविणे, कार्यक्रमाची प्रसिद्धी करणे आणि आर्थिक उलाढाल वाढविणे हाच कार्यक्रमाच्या यशाचा निकष असू नये. रसिकांच्या मनात भक्तिभाव, विचारांची समृद्धी आणि भजन परंपरेविषयी आदर निर्माण झाला, तरच तो कार्यक्रम खऱ्या अर्थाने यशस्वी ठरतो.

आयोजकांनी कलाकारांना व्यासपीठ द्यावे पण याबरोबरच अनुचित प्रकार घडू नये बाबतची दक्षता घ्यावी.

भजनाचा कार्यक्रम आयोजित करणे हा जसा सन्मान आहे, त्या सन्मानासोबत सांस्कृतिक जबाबदारीही येते. त्यामुळे कलाकारां इतकीच आयोजकांची भूमिकाही महत्त्वाची आहे.अर्थात, प्रत्येक घटनेत आयोजकांचा दोष गृहीत न धरता त्यांची प्रत्यक्ष भूमिका आणि उपलब्ध परिस्थिती विचारात घेणे महत्त्वाचे आहे.

कारण कलाकारांची प्रतिष्ठा जपणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच भजनासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या आयोजकांची जबाबदारी निश्चित करणेही आवश्यक आहे.

भजनाचा कार्यक्रम आयोजित करणे सोपे आहे; पण त्या कार्यक्रमातून भजन संस्कृतीचा सन्मान वाढविणे हेच खऱ्या आयोजकांचे मोठेपण आहे!

भजनातील भाषेची मर्यादा, डबलबारीतील प्रश्नोत्तरांचे स्वरूप, संतवाङ्मयाचा अभ्यास, या बाबत ठोस उपाययोजने सोबत कलाकारांचे प्रबोधन, परस्पर संवाद आणि आत्मपरीक्षण यातूनच भजन क्षेत्र अधिक समृद्ध होईल.

शेवटी… भजन जपायचे असेल तर भजनातील संस्कारही जपावे लागतील!

आजच्या पिढीसमोर भजन संस्कृतीचा कोणता आदर्श ठेवायचा, हा खरा प्रश्न आहे. आपण पुढच्या पिढीला संतांचे अभंग देणार आहोत की एकमेकांचा अपमान करण्याची भाषा देणार आहोत? आपण त्यांना विचारांची समृद्धी देणार आहोत की वैयक्तिक संघर्षाची संस्कृती देणार आहोत?

या प्रश्नांची उत्तरे प्रत्येक भजनी कलाकाराने स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे.

भजनातील स्पर्धा ज्ञानाची असावी, अभ्यासाची असावी, संगीताची असावी आणि संतविचारांच्या मांडणीची असावी. कलाकारांनी एकमेकांशी स्पर्धा जरूर करावी; पण एकमेकांचा सन्मान गमावून नव्हे.

या प्रकरणात संबंधित कलाकारांनीही आत्मपरीक्षण करावे आणि आयोजकांनी भविष्यात अधिक जबाबदारीने कार्यक्रमांचे आयोजन करावे.

कारण एखादा कलाकार लोकप्रिय होणे ही त्याची उपलब्धी असू शकते; पण त्याच्या कलेमुळे संपूर्ण परंपरेचा सन्मान वाढणे ही खरी उपलब्धी आहे.

भजनाचे व्यासपीठ हे अहंकाराचे नव्हे, तर भक्तीचे असावे. ते अपमानाचे नव्हे, तर विचारांचे असावे. ते वादाचे नव्हे, तर संवादाचे असावे.

भजन ही आपली सांस्कृतिक ठेव आहे. ती पुढील पिढीपर्यंत अधिक समृद्ध स्वरूपात पोहोचविण्याची जबाबदारी आजच्या प्रत्येक भजनी बुवाची, आयोजकाची आणि रसिकाची आहे.

व्यक्ती येतील-जातील, बुवांची पिढी बदलेल; पण भजन परंपरेचा निनाद अखंड राहिला पाहिजे. हाच या संपूर्ण घटनेतून आपण घ्यावयाचा खरा बोध! भजनाचा गजर भक्तीचा असावा, विचारांचा असावा आणि संस्कारांचा असावा; वादाचा कल्लोळ होऊ नये!

कबीराच्या भाषेत सांगायचे झाले तर

*ऐसी वाणी बोलिए, मन का आपा खोय* ।

*औरन को शीतल करे, आपहुँ शीतल होय* ॥

भजनातील संवादाची भाषा अशी असावी की ऐकणाऱ्याच्या मनाला आनंद मिळावा, कोणाच्याही मनाला ठेच लागू नये. एवढीच माफक अपेक्षा…

 

—

 

प्रा. वैभव खानोलकर

लोककला अभ्यासक |सिंधुदुर्ग