गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग जलसंवर्धन कार्यासाठी जल गौरव पुरस्काराने सन्मानित

रत्नागिरी-
रत्नागिरी जिल्ह्यात जलसंधारण, जलसाक्षरता आणि जलसुरक्षा संदर्भातील जागृतीच्या क्षेत्रात गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाने अत्यंत महत्त्वपूर्ण व उल्लेखनीय सामाजिक योगदान दिले आहे.

 
ग्रामीण भागात वनराई बंधारे बांधणे, पाणलोट क्षेत्रविकास, जलसाक्षरता रॅली, पथनाट्ये आणि श्रमदानाच्या माध्यमातून पाणी अडवा-पाणी जिरवा हा संदेश प्रभावीपणे पोहोचवल्याबद्दल रत्नागिरी जिल्हा जल साक्षरता अभियान, रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्था मर्यादित, हिरवळ प्रतिष्ठान व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘रत्नागिरी जिल्हा शाश्वत पाणी परिषद’ मध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी राष्ट्रीय सेवा योजना विभागास ‘जलसेवा गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाने जलसंवर्धनाच्या क्षेत्रात प्रत्यक्ष श्रमदानावर आधारित अनेक उल्लेखनीय उपक्रम राबविले आहेत. यातील विशेष महत्त्वाचा उपक्रम म्हणजे गोळप नदी पुनरुज्जीवन प्रकल्प या प्रकल्पात महाविद्यालयातील स्वयंसेवकांनी नदीपात्रातील गाळ काढणे, जलप्रवाहाला अडथळा निर्माण करणारे घटक दूर करणे आणि स्थानिक नागरिकांच्या सहभागातून जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्याचे कार्य करून एक सामाजिक आदर्श ठेवला आहे. हे अभियान २६ डिसेंबर २०१० ते २ जानेवारी २०११ या कालावधीत राबविण्यात आले होते. या कामामध्ये महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक आणि गोवा येथील सुमारे ७५० महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते.

याशिवाय प्रत्येक शिबिरातील दत्तक गावातील लोकांसाठी प्रत्यक्ष बंधारे बांधणे, गाळ उपसणे, कचरामुक्त जलस्त्रोत असे उपक्रम सातत्याने राबविले आहे.जन जागृतीसाठी पथ नाट्ये तसेच जल सर्वेक्षण व जल तपासणी, नागरिकांच्या मुलाखती व जलस्त्रोत दूषित  होणार नाहीत याची काळजी तसेच, सांडपाणी व्यवस्थापन याचे संदर्भात सातत्याने उपक्रम केले आहेत.
 
नाखरे, नातुंडे, मावळंगे, दांडेअडोम, पावस, शिवार आंबेरे, कुर्धे, केळ्ये, चांदेराई, निरूळ अशा विविध गावांमधून शेकडो बंधाऱ्यांची उभारणी करून आपले ग्रामस्थांना तसेच शासकीय कार्यात आपले योगदान दिले आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी आजी माजी कार्यक्रमाधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना विभागातील आजी माजी स्वयंसेवक, जल संवर्धन संदर्भात सहकार्य करणारे  छात्रसेना, इको क्लब स्वयंसेवक यांचे अभिनंदन केले.