दोघे चोरट्यांना पकडून ग्रामस्थांनी दिले पोलिसांच्या ताब्यात..

वेंगुर्ले : दाजी नाईक
वेंगुर्ले उभादांडा येथील श्री.देव हेळेकर मंदिरात चोरी करून चोरीचे सामान घेऊन पळणाऱ्या नवरा बायको असलेल्या परप्रांतीय जोडप्याला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
वेंगुर्ले शिरोडा मार्गावर उभादांडा येथे श्री देव हेळेकर मंदिर आहे. रस्त्यालगत असणाऱ्या या मंदिरात असलेले सामान एका जोडप्याने पहाटे चोरून रस्त्यावर आणले. तेथून पळून जाण्यासाठी ते गाडीची वाट पाहत होते. सकाळच्या दरम्यान मॉर्निंग वॉक ला जाणाऱ्या ग्रामस्थांना त्यांचा संशय आला. त्यांनी चौकशी केली असता या दोघांनी मंदिरातील सामान चोरल्याचे समोर आले. चोरी केलेल्या सामानामध्ये मृदुंग, स्पीकर, आतील गेट, अन्य सामान चोरून त्यांनी बांधून रस्त्यावर आणून ठेवले होते.
रस्त्यावर सामानाच्या बाजूला बसलेले हे जोडपे परप्रांतीय असून ते एका ठेकेदाराकडे कामाला आले होते. कामाच्या निमित्ताने त्यांनी ही मंदिरात चोरी केली.
या प्रकरणी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. सायंकाळी उशिरापर्यंत याबाबत पुढील प्रक्रिया सुरू होती मात्र अद्याप चोरी प्रकरणी कुणावरही गुन्हा दाखल झालेला नाही.













