१० रोजी चिपळुणात तर १३ रोजी वहाळ येथे विनामूल्य सांगीतिक मैफल
अभंग, भक्तिगीत आणि नाट्यगीतांची रसिकांना पर्वणी
चिपळूण (प्रतिनिधी) : दिवाळीच्या मंगलमय पहाटेला सुरेल स्वरांची साथ लाभली, तर सणाचा आनंद द्विगुणित होतो. गेल्या चार दशकांपासून दिवाळी पहाट या सांगीतिक संकल्पनेचा वारसा जपणाऱ्या चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीने यंदाही चिपळूण आणि वहाळ येथे दोन विशेष सांगीतिक मैफलींचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. १० नोव्हेंबर रोजी चिपळूण येथील ब्राह्मण सहाय्यक संघात सकाळी ६ वाजता, तर शुक्रवार दि. १३ नोव्हेंबर रोजी वहाळ येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या सभागृहात सकाळी ६.३० वाजता या मैफली रंगणार आहेत.
दिवाळी पहाट या वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनेची सुरुवात सुमारे ४० वर्षांपूर्वी चतुरंगच्या मंचावर झाली. १९८६ मध्ये मुंबईतील शिवाजी मंदिर येथे ‘वाहतो ही दुर्वांची जोडी’ या नाटकाच्या प्रयोगातून पहिल्या दिवाळी पहाटेचा सांगीतिक-सांस्कृतिक अनुभव रसिकांना मिळाला. त्यानंतर देवकी पंडित, आशा खाडिलकर, उपेंद्र भट, अनुप जलोटा, पं. हृदयनाथ मंगेशकर, अश्विनी भिडे-देशपांडे, पं. उल्हास कशाळकर, आनंद भाटे यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या सहभागातून चतुरंगने दिवाळी पहाटेची समृद्ध परंपरा निर्माण केली. २०२४ मध्ये सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे केल्यानंतर चतुरंगने दिवाळी पहाट अनाथालये, वसतिगृहे आणि वृद्धाश्रमांमध्ये साजरी करण्याचा नवा उपक्रमही सुरू केला आहे.
चिपळूण येथील मैफलीत कोकणचे सुपुत्र आणि ख्यातकीर्त गायक विशारद गुरव अभंग, भजन, भक्तिगीत आणि नाट्यगीतांची सुरेल मेजवानी सादर करणार आहेत. कु. स्वरांगी जोशी निवेदन करणार असून अमित ओक हार्मोनियमवर, तर अमेय भिडे तबल्यावर साथसंगत करणार आहेत. वहाळ येथील मैफलीत सुप्रसिद्ध गायक-अभिनेता ओंकार प्रभुघाटे ‘गाणी आठवणीतली… मनामनातली!’ या संकल्पनेतून अभंग, भक्तिगीत आणि नाट्यगीतांचा स्वराविष्कार सादर करणार आहेत. संत साहित्याचे अभ्यासक धनंजय चितळे निवेदन करणार असून अमित ओक हार्मोनियम, सोहम जोशी तबला आणि इयत्ता सहावीत शिकणारा आरुष कुडाळकर टाळांची साथ करणार आहे. चतुरंगच्या निवासी अभ्यासवर्गातील विद्यार्थी, वहाळ पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच चिपळूण, सावर्डे, माखजन, आरवली परिसरातील संगीतप्रेमींना या मैफलींचा आनंद घेता येणार आहे. विशेष म्हणजे दोन्ही कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य खुले असून, लोकप्रिय आणि मनामनात रुजलेल्या गीतांची सुरेल मेजवानी अनुभवण्यासाठी चतुरंग प्रतिष्ठानने सर्व गानप्रेमींना आग्रहाचे निमंत्रण दिले आहे.










