तीन टँकरची केली व्यवस्था
चिपळूण (प्रतिनिधी) : मार्कंडी विभागात पाण्याच्या पाइपलाइनचे काम सुरू असल्याने निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा फटका श्री स्वामी समर्थ हौसिंग सोसायटीमधील रहिवाशांना बसत होता. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना पाण्याअभावी मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता. या परिस्थितीची दखल घेत नगरसेवक तथा चिपळूण नगर परिषदेचे पाणीपुरवठा सभापती निहार कोवळे यांनी तत्परता दाखवत तीन पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली.
पाणीटंचाईच्या समस्येबाबत सोसायटीचे नरेश मोरे, अप्पा कदम, संतोष इनामदार व अन्य सभासदांनी नगरसेवक निहार कोवळे यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. त्यावेळी कोवळे हे बाहेरगावी असतानाही त्यांनी या समस्येची तातडीने दखल घेत त्याच संध्याकाळी पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला. विशेष म्हणजे, रात्री ११ वाजता प्रवासात असतानाही त्यांनी फोन करून सोसायटीतील पाणीपुरवठ्याबाबत आस्थेने चौकशी केली. तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी आणखी दोन टँकरची व्यवस्था करून रहिवाशांना दिलासा दिला. या कामात चिपळूण नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी मंगेश पेढांबकर, नागरी सुविधा केंद्र प्रमुख वलीद वांगडे, वाहन विभागाचे लिपिक दीपक कात्रे, पाणी विभागाचे योगेश सटवे आणि सहाय्यक लिपिक सुशील सकपाळ यांनीही मोलाचे सहकार्य केले. कोणतीही सबब न सांगता नागरिकांच्या पाणीटंचाईच्या समस्येला तातडीने प्रतिसाद देऊन मदत केल्याबद्दल श्री स्वामी समर्थ हौसिंग सोसायटी, मार्कंडीच्या वतीने नगरसेवक निहार कोवळे तसेच नगर परिषदेतील सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे संतोष इनामदार यांनी जाहीर आभार मानले आहेत.











