न.प.ने वाहतुकीत अडथळा करणाऱ्यांना दिला दणका
चिपळूण (प्रतिनिधी) : शहरातील बाजारपेठेत रस्त्यांवर अतिक्रमण केलेल्या व्यावसायिकांना मंगळवारी नगर परिषदेने दणका दिला. काहींना समज देण्यात आली असून ही कारवाई सुरुच राहाणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढताना दिसत आहे. मध्यंतरी या अतिक्रमणावर धडक कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने सध्या शहरातील उक्ताड, गुहागरनाका, गोवळकोटरोड, बाजारपेठ, पानगल्ली, चिंचनाका, भोगाळे, काविळतळी, मार्कंडी, बहादूरशेखनाका, पॉवरहाऊस आदी भागात अतिक्रमण फोफावले आहे. त्यामुळे वाहतूककोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला असून नागरिकांना चालणेही कठीण बनले आहे. त्यामुळे याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. यातूनच मुख्याधिकारी संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने बाजारपेठेतील अतिक्रमणावर कारवाई केली. अनेकांची छप्परे काढून टाकत रस्त्यावर मांडलेल्या टोपल्या, बाहुली मागे घेण्यास भाग पाडले. अनेकांना त्यांचे अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. ही कारवाई अशीच सुरू राहाणार आहे. त्यामुळे व्यावसायिकांचे धाबे दणाणले.











