तारकर्ली-कोरजाई रो-रो बोट सेवा व जलपर्यटनाच्या विकासाला नवी दिशा!

४ कोटी ९७ लाखांचा निधीतून तारकर्ली जेटीच्या मजबुतीकरण व आधुनिकीकरणचे होणार काम

आमदार निलेश राणे यांच्या यशस्वी पाठपुराव्यातून निधी मंजूर

पालकमंत्री नितेश राणे यांच्या रोरो बोट सेवा घोषणा अंमलबजावणीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जलपर्यटनाला नवी दिशा देणाऱ्या तारकर्ली ते कोरजाई रो-रो बोट सेवा प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती मिळाली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी तारकर्ली येथील अस्तित्वातील जेटीचे मजबुतीकरण व आधुनिकीकरण करण्यात येणार असून, त्यासाठी तब्बल ४ कोटी ९७ लाख १९ हजार ८४० रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाल्याने रो-रो बोट सेवा प्रत्यक्षात साकारण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. आमदार निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या प्रकल्पाच्या कामाला गती मिळाल्याचे शिवसेना मालवण तालुकाप्रमुख मंदार लुडबे यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी पालकमंत्री तथा बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी तारकर्ली ते कोरजाई दरम्यान रो-रो बोट सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. या घोषणेच्या अनुषंगाने आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार निलेश राणे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यातून तारकर्ली जेटीच्या मजबुतीकरण व आधुनिकीकरणासाठी निधी मंजूर झाला असून, निविदा प्रक्रियेलाही सुरुवात झाली आहे. या प्रकल्पांतर्गत कोरजाई येथेही जेटी उभारण्यात येणार आहे.

मालवण तालुक्यातील तारकर्ली हे देश-विदेशातील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण केंद्र आहे. येथील निसर्गसौंदर्य, समुद्रकिनारे आणि जलक्रीडा पर्यटनामुळे या परिसराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रस्तावित रो-रो बोट सेवेमुळे तारकर्ली आणि कोरजाई दरम्यान जलमार्गाने प्रवासाचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. या सेवेमुळे पर्यटकांच्या दळणवळणाच्या सुविधांमध्ये भर पडण्याबरोबरच पर्यटन व्यवसायाच्या विस्तारालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

विशेषतः तारकर्ली, कोरजाई आणि परिसरातील हॉटेल, होमस्टे, पर्यटन सेवा, वाहतूक तसेच स्थानिक लघुउद्योजकांना या प्रकल्पाचा लाभ होऊ शकणार आहे. पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक युवकांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्यासही मदत होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प केवळ जलवाहतुकीपुरता मर्यादित न राहता परिसराच्या पर्यटनाधारित अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

दरम्यान, तारकर्ली जेटीच्या आधुनिकीकरणासाठी निधी मंजूर होऊन निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. शिवसेना मालवण तालुकाप्रमुख मंदार लुडबे यांनी आभार व्यक्त केले. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने मोठा विकासनिधी उपलब्ध करतं असलेले माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.