सिंधुदुर्गचे सुपुत्र संतोष चिले यांना ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी जय हिंद गौरव पुरस्कार जाहीर.

ओटवणे (प्रतिनिधी ) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे गावचे सुपुत्र संतोष चिले यांना या वर्षीचा “राष्ट्रपिता महात्मा गांधी जय हिंद गौरव पुरस्कार “जाहीर झाला असून या पुरस्काराचे वितरण एका भव्य दिव्य सोहळ्यात येत्या

१५ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे होणार आहे. त्यांनी आजपर्यत

साहित्य आणि कला क्षेत्रासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल हा सन्मान दिला जाणार आहे. तसेच मुंबई साहित्य सेवा क्षेत्रातील अविरत, उल्लेखनीय आणि विशेष योगदानाबद्दल संतोष चिले यांना हा या वर्षीचा २०२६ चा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी जय हिंद गौरव पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे.

संतोष चिले हे साहित्य क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करीत आहेत. आणि त्यांनी साहित्याला दिलेल्या योगदानबद्दल त्यांना अनेक पुरस्काराही प्राप्त झाले आहेत. त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव म्हणून आजपर्यंत १२ प्रतिनिधिक काव्यसंग्रहांमध्ये त्यांच्या कविता प्रकाशित झाल्या असून त्यांचा “मुक्या वेदना” हा स्वतंत्र काव्यसंग्रह लवकरच प्रकाशित होत आहे. सध्या ते अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे सभासद तसेच सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडत असून साहित्य, संस्कृती आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून समाजात मोलाचे योगदान देत आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात व गोवा या राज्यांमध्ये आयोजित विविध कवी संमेलनांमध्ये सहभागी होऊन त्यांनी व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण संवर्धन आणि शिक्षणाचे महत्त्व यांसारख्या सामाजिक विषयांवर आपल्या प्रभावी कवितांद्वारे समाजप्रबोधन केले आहे.

संतोष चिले यांनी आपल्या प्रदीर्घ साहित्य साधना आणि कला प्रवासातून सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.आणि याचीच दखल घेऊन ‘सोमनाथ गायकवाड सामाजिक प्रतिष्ठान’ व ‘प्रियदर्शिनी फाउंडेशन (रजि.)’ यांच्या संयुक्त विद्यमाने या पुरस्काराकासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.

हा दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळा विविध क्षेत्रांतील सामाजिक, राजकीय आणि साहित्यिक मान्यवरांच्या विशेष उपस्थितीत संपन्न होणार आहे.

संतोष चिले यांना हा मानाचा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्रियदर्शिनी फाउंडेशन आणि सोमनाथ गायकवाड सामाजिक प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांसह (सुभाषराव गायकवाड, सुरज भोईर, मेघना जोशी) तसेच साहित्य, कला आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गजांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.तसेच आपणाला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे केवळ आपलाच सन्मान नसून आपल्या साहित्याचा तसेच आपल्या ओटवणे गावचा सन्मान असल्याच्या भावना संतोष चिले यांच्याकडून व्यक्त केल्या जात आहेत. विविध सामाजिक सांस्कृतिक साहित्य क्षेत्रा बरोबरच ओटवणे गावातूनही त्यांच्यावर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.