राजापूर पोलिसांनी डोंगर येथे श्रमदान करत ग्रामस्थांच्या सहभागातून बांधला वनराई बंधारा

राजापूर प्रतिनिधी : राजापूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण आणि पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राजापूर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचारी यांनी सामाजिक बांधिलकी जपत डोंगर येथे स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्यातुन श्रमदान करत वनराई बंधारा बांधला आहे. पोलीस निरीक्षक अमित यादव यांसह सर्व अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते.
उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन पावसाचे पाणी अडवणे आणि त्याचा साठा वाढवणे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. पोलिसांनी स्वतः श्रमदान करत ग्रामस्थांच्या मदतीने वनराई बंधारा बांधला. अशा बंधाऱ्यांमुळे पाणी अडवून भूजल पातळी वाढण्यास तसेच परिसरातील पाण्याची उपलब्धता टिकवून ठेवण्यास मदत होणार आहे.
या उपक्रमावेळी डोंगर गावच्या सरपंच जुबेदाबी मस्तान, ग्रामसेविका सौ. किनरे, ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ गुरव, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पुजारी (उन्हाळे), संदीप पवार, डोंगरचे पोलीस पाटील दीपक डोंगरकर, डोंगर मुसलमानवाडीचे पोलीस पाटील सचिन कदम, दत्तवाडीचे पोलीस पाटील किरण कामतेकर, चौकेचे पोलीस पाटील श्री. तांबे, दोनीवडेच्या पोलीस पाटील सौ. करंगुटकर, विखारे गोठणेचे पोलीस पाटील संजय पावसकर यांच्यासह शामराव कदम, शंकर भुते, संदेश कदम, वसंत देवळेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.