राष्ट्ररक्षण आणि सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी भाजप कार्यकर्त्यांनी कटिबद्ध राहावे!

राष्ट्रचिंतन बैठकीत प्रमोद जठार यांचे प्रतिपादन
 मोदी सरकारच्या कार्याचा घेतला आढावा

चिपळूण (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाची विचारधारा ही केवळ राजकीय सत्तेपुरती मर्यादित नसून भारताचा हजारो वर्षांचा सांस्कृतिक वारसा, परंपरा आणि राष्ट्राचे संरक्षण करण्याच्या व्यापक संकल्पनेवर आधारित आहे. जनसंघापासून भारतीय जनता पक्षापर्यंतचा प्रवास हा राष्ट्रहिताच्या विचारांचा प्रवास आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षाची वैचारिक भूमिका समजून घेत राष्ट्ररक्षण आणि भारतीय संस्कृतीच्या संवर्धनासाठी कटिबद्ध राहिले पाहिजे, असे प्रतिपादन भाजप नेते प्रमोद जठार यांनी केले. चिपळूण येथे आयोजित राष्ट्रचिंतन बैठकीत ते बोलत होते. ही बैठक प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात झाली.
‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ अभियानांतर्गत राष्ट्र चिंतन विषयावर मोदी सरकारच्या वाटचालीचा थोडक्यात परामर्श घेतला तर एसआयर विरोधात विरोधकांनी घेतलेल्या भूमिकेचा समाचार घेतला. यावेळी जठार यांनी भारताच्या प्राचीन सांस्कृतिक परंपरेचा संदर्भ देत वैदिक काळापासून या देशात विविध धर्म, भाषा आणि संस्कृती गुण्यागोविंदाने नांदत आल्याचे सांगितले. सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातील विस्तीर्ण भारतापासून ते आजच्या आधुनिक भारतापर्यंतचा सांस्कृतिक प्रवास त्यांनी विशद केला. देशाच्या भौगोलिक सीमा बदलल्या, राजकीय स्थित्यंतरे झाली; मात्र भारताची सांस्कृतिक ओळख कायम राहिली. हाच सांस्कृतिक वारसा जपण्याची जबाबदारी भाजप कार्यकर्त्यांनी स्वीकारली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. जनसंघाच्या स्थापनेपासूनच देशहित, सांस्कृतिक अस्मिता आणि राष्ट्राच्या सुरक्षेचे विचार पक्षाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. अनेक वर्षे सत्तेबाहेर राहूनही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपली वैचारिक भूमिका सोडली नाही. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर या विचारांना प्रत्यक्ष धोरणात्मक स्वरूप मिळू लागले, असे जठार यांनी सांगितले.
मोदी सरकारच्या कार्यकाळातील महत्त्वपूर्ण निर्णयांचा उल्लेख करताना त्यांनी कलम ३७० हटविणे, ब्रिटिशकालीन कायद्यांमध्ये बदल करणे, देशाची संरक्षण व्यवस्था अधिक सक्षम करणे आणि अण्वस्त्र व आधुनिक शस्त्रनिर्मितीच्या क्षेत्रात भारताने केलेली प्रगती यावर भाष्य केले. देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत सरकारने अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ ही भूमिका आणि ‘मोदी है तो मुमकिन है’ हा विश्वास देशाच्या विकासाच्या वाटचालीत महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी सांगितले. समान नागरी कायदा, गुन्हेगारी कायद्यांमधील सुधारणा आणि राष्ट्राच्या सुरक्षेशी संबंधित विषयांवरही त्यांनी आपली भूमिका मांडली. विरोधकांकडून एसआयआरसारख्या प्रक्रियांना विरोध होत असल्याचा उल्लेख करत त्यांनी राष्ट्रीय हिताच्या विषयांकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज व्यक्त केली.
चिपळूणमध्ये राष्ट्रचिंतन बैठक आयोजित होणे ही कार्यकर्त्यांसाठी वैचारिकदृष्ट्या महत्त्वाची संधी आहे. आगामी काळात कार्यकर्त्यांची खरी अग्निपरीक्षा असणार आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय घडामोडींमुळे विचलित किंवा संभ्रमित न होता राष्ट्ररक्षण, सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संघटनात्मक बांधिलकी या भूमिकांवर ठाम राहावे, असे आवाहन प्रमोद जठार यांनी केले.
राष्ट्रचिंतन बैठकीत सद्य राजकीय परिस्थितीवर विचारमंथन होणे आवश्यक- प्रशांत यादव
भाजप रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी प्रास्ताविकात आपले मनोगत मांडताना ते म्हणाले की, देशातील सध्याची राजकीय परिस्थिती, लोकशाहीच्या नावाखाली सुरू असलेली आंदोलने, निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर उपस्थित केले जाणारे प्रश्न आणि विरोधकांकडून सुरू असलेल्या विविध राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांनी वस्तुस्थिती समजून घेणे आवश्यक आहे. यासाठीच राष्ट्रचिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या मनातील शंका, प्रश्न आणि संभ्रम दूर करून पक्षाची वैचारिक दिशा स्पष्ट करण्याचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन भाजप दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी प्रास्ताविकात केले.
देशाच्या विविध भागांत लोकशाही वाचविण्याच्या नावाखाली आंदोलने, निवडणूक आयोगाला आव्हान देण्याचे प्रयत्न आणि प्रति संसदेसारखे उपक्रम सुरू आहेत. या सर्व घडामोडींमुळे नेमके काय सुरू आहे, असा प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण होत आहे. त्यामुळे केवळ राजकीय प्रतिक्रिया देण्यापेक्षा या परिस्थितीचा अभ्यास करून योग्य भूमिका घेणे महत्त्वाचे आहे, असे यादव यांनी स्पष्ट केले. राष्ट्रचिंतन बैठकीच्या माध्यमातून उपस्थित मान्यवरांचे मार्गदर्शन, खुली चर्चा आणि विचारांची देवाणघेवाण होणार आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. त्याचप्रमाणे चर्चेतून चुका लक्षात घेऊन आवश्यक त्या सुधारणा करण्याची संधीही मिळाली पाहिजे. कार्यकर्त्यांच्या मनातील प्रश्नांना या बैठकीतून उत्तरे मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पक्षात कोणताही कार्यकर्ता लहान किंवा मोठा नसून, प्रत्येकजण आपल्याला मिळालेली जबाबदारी आणि पदाच्या क्षमतेनुसार प्रामाणिकपणे योगदान देत असतो. पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संघटनात्मक कामासाठी सातत्याने मेहनत घेत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात शासनाचे प्रतिनिधी आणि पक्षाचे प्रतिनिधी यांच्या समन्वयातून सर्वेक्षणासह विविध कामे केली जात असून, त्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून कार्यकर्ते रात्रंदिवस परिश्रम घेत असल्याचेही प्रशांत यादव यांनी नमूद केले.
यावेळी भाजपा महिला मोर्चा रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सौ. वर्षा ढेकणे, भाजपा महिला मोर्चा ओबीसी जिल्हाध्यक्षा सौ. वैशाली निमकर, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद अधटराव, अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष लियाकत शाह, कायदा सेल जिल्हा संयोजक ॲड. मिलींद तांबे, चिपळूणच्या उपनगराध्यक्षा सौ. रुपाली दांडेकर, माजी नगरसेवक विजय चितळे, माजी सभापती रामदास राणे, संकेत घाग, डॉ. सुनील सावंत आदींनी आपली मनोगते मांडली. यावेळी भाजपा नवनिर्वाचित भाजप चिपळूण शहर मंडल अध्यक्ष आशिष खातू, महिला मोर्चा शहराध्यक्ष सौ. रुही खेडेकर यांचा आमदार प्रमोद जठार व भाजपा रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ओबीसी मोर्चा प्रदेश कोकण संघटक संतोष नलावडे, जिल्हाध्यक्ष सहदेव बेटकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ऍड. नयना पवार, निमंत्रित सदस्य सौ. स्वप्ना यादव, जिल्हा परिषद सदस्या सौ. रावी मोरे, पंचायत समिती सदस्य तथा चिपळूण ग्रामीण मंडल अध्यक्ष विनोद भुरण, सौ. सायली वाजे, सौ. सुप्रिया देवरूखकर आदी उपस्थित होते. या बैठकीचे सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके तर आभार सौ. रुही खेडेकर यांनी मानले.