वरेकर, कल्लोळे, पुजारी यांना राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार

चिपळूण (वार्ताहर) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ, मुंबई यांच्याकडून देण्यात येणाऱ्या ‘राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक’ पुरस्कारासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील तीन मुख्याध्यापकांची निवड झाली असून यामध्ये चिपळूण तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज खेर्डी, चिंचघरी (सती) चे मुख्याध्यापक संजय वरेकर, लांजा तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल,पुनस चे मुख्याध्यापक सुरेंद्र कल्लोळे व रत्नागिरी तालुक्यातील श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय,देऊडचे मुख्याध्यापक श्रीशैल्य पुजारी यांचा समावेश आहे.
या मुख्याध्यापकांना दिनांक १३ ते १५ नोव्हेंबर दरम्यान पालघर येथे होणाऱ्या राज्य महामंडळाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात सन्मानित करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अय्युब मुल्ला, उपाध्यक्ष संजय चव्हाण, सचिव महेश पाटकर, राज्य कोषाध्यक्ष संदेश राऊत,सहसंपादक रमेश तरवडेकर यांनी अभिनंदन केले आहे.