पीएसआय सिद्धी सावंत यांचे आवाहन
माध्यमिक पतपेढीतर्फे गुणवंतांचा गौरव
चिपळूण (वार्ताहर) : आपल्या कोकणातील ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये मोठया प्रमाणात गुणवत्ता असून दहावी -बारावीच्या निकालात कोकण बोर्ड अव्वल आहे. तरीही आपले विद्यार्थी एम.पी.एस.सी., यु.पी.एस.सी. सारख्या स्पर्धा परीक्षांकडे मोठया संख्येने जातांना दिसत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची कास धरावी व अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगावे, असे आवाहन चिपळूणच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धी सावंत यांनी केले. चिपळूण येथे आयोजित रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढीच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभात त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतपेढीचे व्हाईस चेअरमन विजय वणवे होते. सावंत पुढे म्हणाल्या की, स्पर्धा परीक्षांना ण घाबरता सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास यश नक्कीच मिळेल.आज सर्वत्र मोबाईल व ए.आय.चा वापर वाढला आहे. वेगवेगळ्या सोशल मीडियाचा वापर विद्यार्थी करतांना दिसत आहेत.सायबर गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर टाळावा किंवा जपून करावा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्ती परीक्षा,दहावी व बारावी परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर व्हाईस चेअरमन विजय वनवे, मानद सचिव सागर पाटील, पोलीस उपनिरीक्षक सिद्धी सावंत पतपेढीचे संचालक नागरगोजे,बिपिन मोहिते, रविंद्र हरवडे,धनाजी गिरी, दिनेश वेताळे, श्रीमती प्रियांका यादव, माजी चेअरमन रामचंद्र महाडिक, धोंडीराम संदे, सुभाष पाटील, माजी तज्ज्ञ संचालक रमेश यादव, सल्लागार समिती सदस्य संजय चव्हाण, रोहित जाधव, शशिकांत पवार, शाखा अधिकारी अविनाश शिंदे यांच्यासह विविध संघटनांचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी, पतपेढीचे सभासद व त्यांचे पाल्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगम कोकाटे यांनी केले, प्रास्ताविक रमेश यादव यांनी तर आभार प्रदर्शन अविनाश शिंदे यांनी केले.













