देवरूख (प्रतिनिधी):
महाराष्ट्र स्केटिंग असोसिएशन यांच्या वतीने आयोजित ३६ व्या महाराष्ट्र राज्य रोलर स्केटिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये १० ते १२ वर्षे वयोगटातील मुलांच्या गटात रेयांश याने उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.
पालघर जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या यजमानपदाखाली विरार (पश्चिम) येथील अमेया क्लासिक क्लब येथे ४ ते ६ नोव्हेंबर २०२६ दरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत रेयांशने आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत १ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्य अशी एकूण तीन पदके पटकावली. या शानदार कामगिरीच्या जोरावर त्याने राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.
रेयांश हा ठाणे येथील युरो स्कूलचा विद्यार्थी असून, अवघ्या ११ वर्षांखालील वयोगटात त्याने ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही त्याने गोवा, म्हैसूर, केरळ, कोलकाता, विशाखापट्टणम, झारखंड आणि मुंबई येथे झालेल्या विविध राष्ट्रीय स्तरावरील रोलर स्केटिंग स्पर्धांमध्ये सात वेळा महाराष्ट्राचे नेतृत्व केले आहे. रेयांशने आतापर्यंत विविध स्केटिंग स्पर्धांमध्ये 55 सुवर्ण, 17 रौप्य आणि 10 कांस्य अशी एकूण 82 पदके मिळविली आहेत. इतक्या लहान वयात 82 पदकांची उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रेयांशच्या या यशाचे क्रीडा क्षेत्रातून विशेष कौतुक होत आहे.
रेयांश हा शिवसेना भांडूपचे युवानेते पराग बने आणि पराग इंग्लिश स्कूल, भांडूपच्या मुख्याध्यापिका सौ. पृथा पराग बने यांचा चिरंजीव आहे. रेयांशच्या या यशामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत असून, त्याच्या प्रशिक्षकांचे, पालकांचे आणि क्रीडाप्रेमींचे अभिनंदन होत आहे. राष्ट्रीय स्पर्धेतही रेयांश अशीच चमकदार कामगिरी करून महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. रेयांशच्या या यशाबद्दल त्याचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून राष्ट्रीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.













