उद्योगमंत्री उदय सामंत यांचे निर्देश
बांदा : प्रतिनिधी
आडाळी एमआयडीसी कडे नेण्यात येणारी ३३ केव्ही क्षमतेची विद्युत वाहिनी बांदा शहरातून भूमिगत पद्धतीने नेण्यात यावी, या मागणीला मोठे यश आले आहे. ओरोस येथे झालेल्या बैठकीत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बांदा पोलीस चेकपोस्ट ते पानवळ दरम्यानची ३ किलोमीटर वीज वाहिनी भूमिगत करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
बांदा हे सावंतवाडी तालुक्यातील महत्त्वाचे व्यापारी केंद्र असून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत वसलेले शहर आहे. शहरातून जाणाऱ्या उच्चदाब विद्युत वाहिनीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन ही वाहिनी भूमिगत करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांनी केली होती.
या संदर्भात पंचायत समिती सदस्या ऋतिका नाईक यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते.
तसेच, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी विशेष पुढाकार घेत या मागणीचा पाठपुरावा केला. ज्यामुळे या विषयाला गती मिळाल्याचे साईप्रसाद काणेकर यांनी सांगितले.
ओरोस येथे एमआयडीसी संदर्भात झालेल्या बैठकीत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी संबंधित यंत्रणेला ३ किलोमीटरची ३३ केव्ही वीज वाहिनी तातडीने भूमिगत करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे बांदा शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागण्याच्या मार्गावर असून, नागरिकांमधून याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.













