विकासकामांचा दर्जा राखण्यासाठी यापुढे बिलो दराने कामे न देण्याचे निर्देश

सावंतवाडी नगरपालिकेच्या मासिक बैठकीत विविध विकासकामांवर चर्चा

शहराच्या विकासाला गती देण्यावर भर

सावंतवाडी । प्रतिनिधी :
​सावंतवाडी नगर परिषदेची मासिक बैठक नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत व्यासपीठावर उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर आणि मुख्याधिकारी विनायक औंधकर उपस्थित होते. या बैठकीत शहरातील विविध प्रलंबित विकासकामांवर सविस्तर चर्चा करून प्रशासकीय निर्णय घेण्यात आले.

​बैठकीत पाणीपुरवठा विभागाच्या कामाचा आढावा घेण्यात आला असून या विभागातील कामकाजात पारदर्शकता राखण्यासाठी आवश्यक ती पडताळणी करण्याचा निर्णय झाला. संत गाडगेबाबा भाजी मंडईच्या नवीन इमारतीमधील वाहन तळाच्या भागातील वॉटरप्रूफिंग आणि इतर कामांच्या ३८ लाख रुपये ज्यादा खर्चाबाबत, पालिकेच्या फंडातून निधी न देता संबंधित विकासकाने शासनाच्या योजनांमधून निधी उपलब्ध करून घ्यावा असा प्रस्ताव पाठवण्याचे ठरले. तसेच शहरातील विकासकामांचा दर्जा राखण्यासाठी यापुढे बिलो दराने कामे न देण्याचे निर्देश देण्यात आले असून सर्वोदय नगरातील खुल्या जागेच्या विकासासाठी मुदतवाढ देण्याबाबत पाहणी करून निर्णय घेण्याचे निश्चित करण्यात आले.

​याशिवाय सर्वोदय नगर आणि गणेश नगर भागातील पाणी योजना व गॅस पाईपलाईनच्या कामामुळे खोदलेल्या रस्त्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश ठेकेदारांना देण्यात आले. शहरात एमएनजीएल कंपनीचे कार्यालय सुरू करण्याबाबत पाठपुरावा करणे, इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील गाळ्यांबाबत नियमानुसार कार्यवाही करणे, भटक्या कुत्र्यांचे नियोजन, गवळी तिठा ते भटवाडी रस्त्यावरील मच्छी विक्रेत्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी नोटीस जारी करणे आणि मच्छी मार्केटमध्ये महिला विक्रेत्यांसाठी बोरवेल व टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.