दुष्काळग्रस्त परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना प्रांताधिकारी विश्वजित गाताडे

संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी टंचाईकृती आराखडे जिल्हाधिकारी यांना सादर 
राजापूर प्रतिनिधी : राजापूर व लांजा तालुक्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना हाती घेण्यात आलेली आहे. याबाबत दोन्ही तालुक्यातील सर्व प्रशासकिय विभागांना सुयोग्य असे नियोजन करण्याबाबतच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. तर संभाव्य पाणीटंचाई निवारणार्थ दोन्ही तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती, नगर परिषद व नगर पंचायत यांचे टंचाईककृती आराखडे तयार करून जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आल्याची माहिती उपविभागिय अधिकारी विश्वजित गाताडे यांनी दिली आहे.
गुरूवारी राजापूर व लांजा तालुक्यातील दुष्काळाबाबत प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना व करण्यात आलेल्या नियोजनाबाबत गाताडे यांनी सर्व प्रशासकिय अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत त्यांनी आढावा घेतला. भात व अन्य पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पुर्ण झाले असून शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. तालुक्यातील एकूण ५ हजार २५१ शेतकऱ्यांनी नुकसानीबाबत प्रस्ताव सादर केले आहेत. त्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत दिली जाणार आहे. तर शासनाकडून देण्यात येणारी पाच हजार रूपयांची मदतही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे.
राजापूर तालुक्यातील १२ व लांजा तालुक्यातील पाच अशा एकूण १७ मंडळांमध्ये दुष्काळी परिस्थिबाबत नियोजन केले जात आहे. याचा आढावा घेतला जात आहे. संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले असून वनराई बंधारे बांधणे, पाणीसाठा करणे, पाण्याचे स्त्रोत अधिक मजबूत करणे यांसारख्या उपाययोजना केल्या जात आहेत. तर राजापूर व लांजा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती, राजापूर नगर परिषद, लांजा नगर पंचायत यांचे टंचाई कृती आराखडे तयार करून ते शासनाकडे पाठविण्यात येणार असुन या दोन्ही तालुक्यांतील हे आराखडे जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आल्याचे गाताडे यांनी सांगितले.
पाण्याचे स्त्रोत जनत करताना शासनाच्या भुजल अधिनियम २००९ चे कलम २०, २२ व २६ नुसार ५०० मिटर अंतरावर असलेल्या पाणीसाठयाचे जतन करताना उपसा करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. तर अशा पाणीस्त्रोतांच्या एक किलोमिटर परिक्षेत्रातही विहिर वा विधंन विहिर खोदण्यास प्रतिबंध रहाणार असल्याचे गाताडे यांनी सांगितले.
दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आमदार किरण सामंत यांच्या सुचनेप्रमाणे स्थानिक पातळीवर सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहभागातुन तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या सहयोगातुन काम केले जात आहे. आपल्यास ह तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषी, जलसंधारण विभाग यासाठी काम करत आहेत.