बोअरवेलची उभारणी कामाचा नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या हस्ते शुभारंभ
पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर नागरिक व पर्यटकांच्या सुविधांसाठी नगरपरिषदेची तत्पर कार्यवाही
मालवण | प्रतिनिधी : मालवण बंदर जेटी येथील सार्वजनिक प्रसाधनगृहातील असुविधा दूर करण्यासाठी मालवण नगरपरिषदेने ठोस पावले उचलली आहेत. प्रसाधनगृहात अधिक प्रमाणात आवश्यक असलेली पाण्याची गरज लक्षात घेता पाण्याच्या कमतरतेमुळे निर्माण होणारी असुविधा व अस्वच्छता दूर करून नियमित व पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा, या उद्देशाने नगरपरिषदेच्या माध्यमातून बोअरवेल उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. या बोअरवेल खोदाई कामाचा शुभारंभ नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
मालवण बंदर जेटी परिसरात स्थानिक नागरिक, व्यावसायिक तसेच पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे येथील सार्वजनिक प्रसाधनगृहात स्वच्छता राखण्यासाठी पुरेशा पाण्याची उपलब्धता असणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, पाण्याच्या कमतरतेमुळे प्रसाधनगृहाच्या स्वच्छतेवर परिणाम होत असल्याने ही समस्या कायमस्वरूपी दूर करण्याच्या दृष्टीने नगरपरिषदेने योग्य नियोजन करून बोअरवेल उभारणीचा निर्णय घेतला आहे.
आगामी पर्यटन हंगाम लक्षात घेता बंदर जेटी परिसरातील सार्वजनिक सुविधांची देखभाल, स्वच्छता आणि आवश्यक सुधारणा करण्यावर नगरपरिषदेने भर दिला आहे. नव्याने उभारण्यात येणाऱ्या बोअरवेलमुळे प्रसाधनगृहासाठी आवश्यक पाण्याचा साठा उपलब्ध होण्यास मदत होणार असून, स्वच्छतेची समस्या दूर होणार आहेत.
या बोअरवेल खोदाई कामाच्या शुभारंभप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, शहरप्रमुख राजू बिडये, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण, नगरसेविका शर्वरी पाटकर, निना मुंबरकर, अश्विनी कांदळकर, मेधा सावंत, भाग्यश्री मयेकर, उद्योजक मोहन वराडकर, जॉन नरोना, भाई मांजरेकर, कमलेश कोचरेकर, संदीप मालंडकर आदी उपस्थित होते.
फोटो : मालवण बंदर जेटी येथील सार्वजनिक प्रसाधनगृहासाठी बोअरवेल खोदाई कामाचा शुभारंभ श्रीफळ वाढवून करताना नगराध्यक्षा ममता वराडकर. सोबत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण, शिवसेना पदाधिकारी, नगरसेविका व अन्य मान्यवर. (अमित खोत, मालवण)













