मालघर महाडिकवाडी येथे ६२ वर्षीय वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

crime

चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील मालघर महाडिकवाडी येथे एका ६२ वर्षीय वृद्धाने राहत्या घराच्या मंडपाच्या लोखंडी पाईपला विजेच्या वायरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली असून या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मालघर महाडिकवाडी येथील रहिवासी अशोक पांडुरंग महाडिक (६२) यांनी गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्यापूर्वी आपल्या राहत्या घराच्या अंगणातील मंडपाच्या लोखंडी पाईपला विजेची वायर बांधून स्वतःला गळफास लावून घेतला. कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ धाव घेऊन त्यांना खाली उतरवले आणि तातडीने उपचारासाठी कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. अशोक महाडिक यांनी नेमक्या कोणत्या कारणातून हे टोकाचे पाऊल उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेमुळे मालघर परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

या संदर्भात मयत अशोक महाडिक यांचे चुलत भाऊ गंगाराम हरी महाडिक यांनी चिपळूण पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, चिपळूण पोलीस ठाण्यात नोंद दाखल करण्यात आला असून पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहेत.