रत्नागिरीत दिवाळीत कडेकोट सुरक्षा; पोलिसांचे कडक पहारा अन् सायबर-ड्रग्जविरोधात विशेष इशारा!

रत्नागिरी : प्रतिनिधी

आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षित, आनंददायी व निर्भय वातावरणात सण साजरा करता यावा, यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दल सतर्क व सज्ज असल्याची माहिती प्रभारी पोलिस अधिक्षक बी.बी.महामूनी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दिवाळी सणाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण करणे तसेच सायबर व आर्थिक फसवणुकीपासून नागरिकांना सुरक्षित ठेवणे यासाठी रत्नागिरी पोलीस दलाकडून आवश्यक खबरदारी व सुरक्षा उपाययोजना करण्यात येत आहेत.

दिवाळीच्या काळात बाजारपेठा, गर्दीची ठिकाणे, धार्मिक स्थळे, पर्यटनस्थळे व महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी योग्य पोलीस बंदोबस्त आणि गस्त वाढविण्यात येणार आहे. चोरी, घरफोडी, सोनसाखळी चोरी तसेच इतर मालमत्ताविषयक गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी विशेष दक्षता घेण्यात येत असून रत्नागिरी पोलीस दलामार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे कि, नागरिकांनी आपली घरे बंद करून बाहेरगावी जाताना आपल्या घराच्या सुरक्षेची काळजी घ्यावी तसेच कोणत्याही इसम, इसमांची संशयास्पद हालचाल निदर्शनास आल्यास तात्काळ डायल 112 या संपर्क साधावा असे आवाहन महामूनी यांच्याकडून करण्यात आले आहे.

तयाप्रमाणे दिवाळी सणाच्या काळात ऑनलाइन खरेदी, आकर्षक सवलती, बनावट लिंक, QR कोड, डिजिटल पेमेंट, बनावट गुंतवणूक योजना, KYC अपडेट तसेच विविध आमिषांद्वारे होणाऱ्या सायबर व आर्थिक फसवणुकीच्या घटनांपासून नागरिकांनी सावध राहावे. अनोळखी व्यक्तींना O.T.P, UPI PIN, बँक खात्याची माहिती किंवा इतर गोपनीय माहिती देण्यात येऊ नये तसेच अनोळखी लिंकवर क्लिक करू नये.सायबर आर्थिक फसवणूक झाल्यास तात्काळ राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांक 1930 वर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर आपली तक्रार नोंदवावी.

अमली पदार्थमुक्त रत्नागिरी निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रभारी पोलीस अधीक्षक, रत्नागिरी बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडून अमली पदार्थांची विक्री, साठवणूक, वाहतूक व सेवन याविरोधात कठोर कारवाई सुरु आहे. तरुण पिढीला अमली पदार्थाच्या विळख्यापासून दूर ठेवण्यासाठी जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि अंमली पदार्थविरोधी विशेष मोहिमांवर भर देण्यात येत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांनी दिवाळीचा सण सुरक्षितपणे व पर्यावरणपूरक पद्धतीने तसेच सामाजिक सलोखा जपत साजरा करावा. कोणतीही अनुचित घटना, संशयास्पद हालचाल किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ डायल 112 वर संपर्क साधावा असे आवाहनही महामुनी यांच्याकडून करण्यात आले आहे.

मिशन फिनिक्समध्ये आता पर्यंत 65 कारवाया करण्यात आलेल्या आहेत. त्यात 93 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून अमली पदार्थही जप्त करण्यात आलेले आहेत. सायबर क्राईममध्ये या आर्थिक वर्षात जिल्ह्यात 37 गुन्हे दाखल झाले असून 3 कोटी 87 लाख 73 हजार 89 रुपयांची फसवणूक करण्यात आलेली आहे. तर त्यातील 1 कोटी 1 लाख 55 हजार 698 रुपये होल्ड करण्यात आलेले आहेत.