आंबोलीत ‘नाईट सफारी’ची पर्यटकांमध्ये प्रचंड क्रेझ!

निसर्गसौंदर्याची मुक्त उधळण अन् रोमांचचा नवा अनुभव;

आंबोली । प्रतिनिधी :
​निसर्गसंपन्न आंबोलीत सध्या ‘नाईट सफारी’ची मोठी क्रेझ असंख्य पर्यटकांमध्ये पाहायला मिळत असून, रात्रीच्या वेळी रोमांचने भरलेला हा प्रवास अनुभवण्यासाठी देशभरातून पर्यटक दाखल होत आहेत. यामुळे आंबोलीच्या बारमाही पर्यटनाला मोठा बूस्टर डोस मिळाला आहे.

जैवविविधतेने नटलेल्या या परिसराची ही अद्भुत नाईट सफारी काही वर्षांपूर्वी ‘आंबोली टुरिझम’कडून बारमाही पर्यटनाच्या दृष्टीने सुरू करण्यात आली होती. आंबोलीसह चौकुळ, गेळे तसेच कुंभवडे, खडपडे (ता. दोडामार्ग) आणि ईसापूर-पारगड (ता. चंदगड – जि. कोल्हापूर) या पट्ट्यात वन्यजीव मोठ्या प्रमाणावर सक्रिय असतात. येथील स्थानिकांनी राखलेली जंगले व पवित्र राई पूर्णतः सुरक्षित असल्याने वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवास आणि त्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. परिणामी, लोकवस्ती व शेतीत विविध प्रजातींच्या वन्यजीवांची सर्रास वर्दळ दिसून येत आहे. एकीकडे या वन्यजीवांच्या वाढत्या संख्येमुळे परिसरातील पारंपारिक शेतीवर परिणाम होऊन चिंतेचे वातावरण असले, तरी दुसरीकडे वन्यजीव पर्यटन आता चांगलेच तेजीत आले आहे.

बंदिस्त प्राणीसंग्रहालय किंवा कुंपणाने वेढलेल्या अभयारण्यातील प्राण्यांपेक्षा आंबोलीच्या मुक्त जंगलातील वन्यजीवांचे दर्शन म्हणजे धैर्याची आणि नशिबाची परकाष्ठा ठरते. किर्रर्र अंधारात व विविध रातकिड्यांच्या भयावह आवाजात रस्त्यालगत किंवा लोकवस्तीत आलेल्या प्राण्यांचे दर्शन अवघ्या काही सेकंदांचे व पूर्णपणे रोमांचित करणारे असते. येथील प्राण्यांना माणसांची चाहूल लागताच ते घनदाट जंगलात धूम ठोकतात, ज्यामुळे हा अनुभव अधिकच थरारक बनतो.

आंबोलीच्या या सफारीत रानगवे, सांबर, भेकर, पिसई, अस्वल, रानमांजरे व सीवेट कॅट्स (कांडीचोर), रानकुत्रे, कोल्हे, डुक्कर, ससे आणि बिबट्यांसह घुबडे, नाईट जार, टिटवी यांसारखे पक्षी आणि विविध साप सहज पाहायला मिळतात. वन्यजीवांच्या दर्शनासोबतच रात्रीची ग्रामीण जीवनपद्धती, शेतीची राखण पद्धती आणि वनौषधीयुक्त तरोताजा करणारा शुद्ध ऑक्सिजन असा परिपूर्ण अनुभव येथे मिळतो. त्यामुळे वन्यजीवांचे दर्शन होवो किंवा न होवो, येथील अविस्मरणीय आनंद घेण्यासाठी पर्यटक आवर्जून येतात आणि प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी या आगळ्या-वेगळ्या नाईट सफारीचा अनुभव घ्यावा, असाच हा प्रवास ठरतो.

​आंबोली टुरिझम’ संस्था पर्यटन पर्यावरण, जैवविविधता व वन्यजीव संवर्धन क्षेत्रात राज्यभर कार्यरत

​आंबोलीला सर्वप्रथम जगाच्या नकाशावर नेणाऱ्या निर्णय राऊत याने ‘आंबोली टुरिझम’ची स्थापना करत बारमाही पर्यटनाचा व रोजगाराचा एक यशस्वी रोडमॅप तयार केला होता. ज्यात अनेक पर्यटन योजना, उपक्रम व नवीन संकल्पनांचा समावेश होता. यातीलच वन्यजीव पर्यटनाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून लोकवस्ती व शेती परिसरात अनेक खडतर आव्हाने पेलत त्यावेळी ‘नाईट सफारी’ची सुरुवात करण्यात आली होती. काही कालावधीतच हा प्रयत्न पूर्णपणे यशस्वी ठरला असून, सद्यस्थितीत आंबोलीत येणाऱ्या पर्यटकांपैकी सुमारे ३५ टक्के पर्यटक हे केवळ कुटुंबियांसह नाईट सफारीचा आनंद घेण्यासाठीच आवर्जून भेट देत आहेत. हीच ‘आंबोली टुरिझम’ संस्था पर्यटन, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण, जैवविविधता व वन्यजीव संवर्धन आदी विविध क्षेत्रात राज्यभर कार्यरत आहे.

​
‘नाईट सफारी’ मुळे आंबोली परिसरातील वन्यजीव शिकारीला मोठा आळा

​गेल्या काही वर्षांत ‘नाईट सफारी’ ही आंबोली परिसरात वन्यजीवांच्या होणाऱ्या शिकारीला मोठा आळा घालणारी ठरली असून, यामुळे शिकाऱ्यांना मोठा अडथळा निर्माण झाला आहे. नाईट सफारीच्या वेळी संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या व्यक्तींवरही सतत नजर ठेवली जाते आणि त्यांची सविस्तर माहिती तत्काळ वनविभागाला दिली जाते. परिणामी, अवैध शिकार प्रकरणांवर एक प्रकारे कडक नियंत्रण मिळवण्यास आंबोलीची ही नाईट सफारी अत्यंत फायद्याची ठरत आहे.