सावंतवाडी : बसस्थानक परिसरातून १२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लांबवणाऱ्या संशयित पती-पत्नीला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण व सावंतवाडी पोलीसांच्या पथकाने सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले होते. सावंतवाडी पोलिसांकडून आरोपींची चौकशी केली असता दागिने कर्नाटक येथील निवासस्थानी ठेवल्याचे त्यांनी कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी आज कर्नाटक येथे जात चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत केला.
सावंतवाडी पोलीस ठाण्यात २१ सप्टेंबर २०२६ रोजी सोन्याचे दागिने चोरीला गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर चोरी दीपक सकट व अमृता सकट यांनी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व सावंतवाडी पोलिसांच्या पथकाने कणकवली तालुक्यातील गडनदीजवळील उभादेव मंदिर परिसरात सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले होते.
दरम्यान, चौकशीदरम्यान त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. कर्नाटक येथील निवासस्थानी १२ तोळे दागिने असल्याचे त्यांनी सांगितले. यानुसार पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील व पथकाने कर्नाटक येथे जात पंचांसमक्ष चोरीचा माल हस्तगत केला. चोरी केलेले १२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने पोलिसांनी ताब्यात घेतले. यात मंगळसूत्र, कानतले, बांगड्या, हार असे १२ तोळ्यांचे दागिने आढळून आलेत.
पोलिसांनी ते ताब्यात घेतले असून आज आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावत जामीन मंजूर करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली. यावेळी पोलीस उप अधिक्षक राजेश भागवत, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षद हिंगे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील, सहाय्यक पोलीस फौजदार निलेश परब, हेड कॉन्स्टेबल मंगेश शिंगाडे, हनुमंत धोत्रे, अमित राऊळ, मनिष शिंदे, निलेश नाईक, रामदास चव्हाण, श्री. चव्हाण, कॉन्स्टेबल आशिष हिर्लेकर आदी उपस्थित होते. या कारवाईसाठी पोलिसांच कौतुक होत आहे.












