लांजा येथील घटना, गुन्हा दाखल
संतोष कोत्रे
लांजा: पोलीस अधिकारी असल्याचे भासवून व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलद्वारे एका ७८ वर्षीय वृद्ध महिलेला अटकेची व बदनामीची धमकी देत तब्बल ६० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार लांजा येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लांजा शेवरवाडी, सीनिअर कॉलेजजवळ राहणाऱ्या ७८ वर्षीय महिलेची ३१ ऑक्टोबर सकाळी ९.३० ते ५ नोव्हेंबर २०२६ सायंकाळी ७ वाजेपर्यंत या कालावधीत फसवणूक करण्यात आली. आरोपीने पोलीस गणवेश परिधान करून आपण नाशिक येथील पंचवटी पोलीस ठाण्यातून बोलत असल्याचे भासवले. त्यानंतर व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल करून महिलेचा विश्वास संपादन केला.
फिर्यादी महिलेच्या आधारकार्डचा वापर करून मुंबई येथील कॅनरा बँकेत खाते उघडण्यात आले असून अब्दुल रहमान नावाची व्यक्ती विविध संघटनांकडून पैसे गोळा करून महिलेच्या नावावरील या खात्यात जमा करत असल्याचे सुशांत पिसे (पूर्ण नाव, गाव, पत्ता नाही) असे नाव सांगणाऱ्या अनोळखी व्यक्तीने सांगितले. तसेच या व्यवहारातून महिलेला १० टक्के कमिशन दिले जात असल्याचा आरोप करून तिला अटकेची व बदनामीची धमकी देण्यात आली.
त्यानंतर आरोपीनी महिलेला घाबरवून तिच्याकडून एसबीआय बँक खात्यातून आरटीजीएसद्वारे पुणे येथील पुनित ट्रेडर्सच्या बँक ऑफ इंडिया खात्यावर पैसे जमा करण्यास सांगितले. आरोपींच्या सांगण्यावरून संबंधित महिलेने वेळोवेळी रक्कम हस्तांतरित केली. अशा प्रकारे आरोपीनी एकूण ६० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.
याप्रकरणी ७ नोव्हेंबर रोजी सायबर पोलीस ठाण्यात सुशांत पिसे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३१८ (४), ३१९ (२), २०४, २०५ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६६ (क) व (ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.













