रत्नागिरी :
रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑलआऊट ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, बेकायदेशीरपणे अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका आरोपीस रंगेहात अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून तब्बल १ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ०९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ०३:३२ वाजण्याच्या सुमारास जेलरोड नाका, रत्नागिरी येथे रस्त्याच्या बाजूला ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रत्नागिरीचे पोलीस हवालदार तथा फिर्यादी गणेश राजेंद्र सावंत आणि त्यांचे पथक नाकाबंदी करत असताना, संशयित आरोपी हा आपल्या ताबेकब्जात ब्राऊन हेरॉईन (टर्की) सदृश अंमली पदार्थ व इतर साहित्य गैरकायदेशीर विक्रीच्या उद्देशाने बाळगून असलेला मिळून आला. या प्रकरणी अटकेतील आरोपी नुफेरअली खालीद तांडेल (वय २१, रा. गाजी मोहल्ला, वरचा वाडा, साखरी नाटे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये ६ ग्रॅम वजनाचा (निव्वळ वजन ४ ग्रॅम) आणि १२० पुड्यांच्या स्वरूपातील ब्राऊन हेरॉईन, पुड्या बांधण्याचे साहित्य, ५ हजार रुपये किमतीचा रिअलमी कंपनीचा मोबाईल आणि १ लाख रुपये किमतीची सुझुकी एक्सेस दुचाकी (रजि.क्र. एमएच ०८ एवाय २८०५) यांचा समावेश आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४६४/२०२६ अन्वये एन.डी.एस.पी. ॲक्ट १९८५ च्या कलम ८ (क), २१ (अ) प्रमाणे दिनांक ०९/११/२०२६ रोजी सकाळी ०७:१७ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.













