गुहागर प्रतिनिधी :
जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून व पालकमंत्री उदय सामंत यांच्या विशेष प्रयत्नातून आणि पाठपुराव्याने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे गुहागर पोलिस ठाण्याला एक रोबोटीक वॉटर क्राफ्ट प्राप्त झाले आहे. गणपतीपुळे व्यतिरिक्त रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागर व आरे वारे या समुद्रकिनाऱ्यावर प्रत्येकी एक, तर गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर दोन रोबोटीक वॉटर क्राफ्ट देण्यात आले आहेत.
पुणे, मुंबई व घाट माथ्यावरून येणाऱ्या पर्यटकांना समुद्रकिनाऱ्याचे विशेष आकर्षण असते. सात किलोमीटर लांबीचा स्वच्छ सुंदर समुद्र किनारा, येथील श्री देव व्याडेश्वर आणि दुर्गादेवी हि देवस्थाने अनेकांचे कुलदैवत असल्याने वर्षातील बाराही महिने पर्यटकांची मोठी गर्दी असते. गुहागरच्या समुद्र स्नानासाठी पर्यटकांची मोठी गर्दी उसळते. परंतु खोल समुद्रात जाऊन समुद्र स्नानाचा आनंद लुटणाऱ्या पर्यटकांना अनेक वेळा समुद्रात बुडताना बाहेर पडणे कठीण होते. यासाठी त्यांच्या सुरक्षितेसाठी गुहागर नगरपंचायतीकडून किनारपट्टीला जीवरक्षक नेमण्यात आले आहेत. आता त्यांच्या जोडीला रोबोटीक वॉटर क्राफ्ट या मशीनचा वापर आता केला जाणार आहे. समुद्रकिनाऱ्यावर एखादी दुर्घटना घडत असल्यास तत्काळ यंत्रणा तत्पर असावी या उद्देशाने गुहागर पोलिस ठाण्याकडून होमगार्ड व पोलिस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना रोबोटीक वॉटर क्राफ्टशी संबंधित यंत्रणेकडून खास प्रशिक्षण देण्यात आले आहे.
गुहागर समुद्रकिनाऱ्यावरील प्रात्यक्षिक दरम्यान पोलीस निरीक्षक प्रवीण रणदिवे, पोलीस कर्मचारी प्रशांत पाटील, उदय मोनये, भावेश रोहिलकर, किशोर साळवी, अनिकेत चव्हाण, कुमार घोसाळकर व होमगार्ड उपस्थित होते.












