कोकण रेल्वेचे स्वप्न साकार करणारे तत्त्वनिष्ठ लोकनेते प्रा. मधु दंडवते : उमेश गाळवणकर

कुडाळ रेल्वे स्थानकासह बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

स्वप्निल कदम -कुडाळ :      राजकारणातील तत्त्वनिष्ठ तपस्वी, अर्थतज्ज्ञ आणि समाजवादी विचारसरणीचे लोकनेते म्हणून प्रा. मधु दंडवते यांची ओळख आहे. कोकणचा विकास आणि कोकण रेल्वेचे स्वप्न साकारण्यात प्रा. मधु दंडवते व जॉर्ज फर्नांडिस यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. कोकण विकासाचा इतिहास लिहिताना प्रा. मधु दंडवते यांचे नाव कधीही दुर्लक्षित करून चालणार नाही, असे प्रतिपादन बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी केले.

 

प्रा. मधु दंडवते यांच्या पुण्यतिथीनिमित्त कुडाळ रेल्वे स्थानक येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी प्रा. दंडवते यांच्या साध्या राहणीमानाचा, उच्च विचारसरणीचा, निगर्वी स्वभावाचा आणि तत्त्वनिष्ठ राजकीय वाटचालीचा आढावा घेतला. कोकण रेल्वेमुळे मुंबई आणि कोकणातील जनतेमधील दळणवळण अधिक सुलभ झाले असून, कोकणच्या विकासाला मोठी गती मिळाली आहे. बॅ. नाथ पै यांनी पाहिलेले कोकण रेल्वेचे स्वप्न प्रा. मधु दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्या प्रयत्नांमुळे प्रत्यक्षात साकार झाले, असेही त्यांनी नमूद केले.

 

प्राचार्य प्रा. अरुण मर्गज यांनी प्रा. मधु दंडवते यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. रेल्वेमंत्री, अर्थमंत्री आणि नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी देशाच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाची माहिती उपस्थितांना दिली. विशेषतः रेल्वेच्या विकासातील त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

 

बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ व सावंतवाडी रेल्वे स्थानकांवरील प्रा. मधु दंडवते यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेतही चेअरमन, विविध विभागांचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि रेल्वे प्रवाशांच्या उपस्थितीत आदरांजली वाहण्यात आली.

 

कुडाळ रेल्वे स्थानकावरील कार्यक्रमास प्रा. अरुण मर्गज, प्रा. परेश धावडे, स्टेशन मास्तर सुरेंद्र राजापकर, रेल्वे कर्मचारी मनोहर चव्हाण, दत्ताराम चव्हाण यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

 

सावंतवाडी रेल्वे स्थानक येथे स्टेशन मास्तर दिनेश चव्हाण, रेल्वे कर्मचारी लक्ष्मण परब, बुधाजी परब, प्रा. परेश धावडे, प्रा. नितीन बांबर्डेकर, प्रसाद कानडे, ज्ञानेश्वर तेली, दिनार गाळवणकर तसेच नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी प्रा. मधु दंडवते यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.