ओटवणे येथे १५ नोव्हेंबरला शिवकालीन वारसा व शस्त्र प्रदर्शन,किल्ले बांधणी स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा.

 

ओटवणे (प्रतिनिधी )

श्री सतीदेवी युवक कला क्रीडा मंडळ आणि संकल्प सेवासंघ, मांडवफातरवाडी, ओटवणे यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले बांधणी स्पर्धा २०२६ निमित्त शिवकालीन वारसा व शस्त्र प्रदर्शन तसेच किल्ला बांधणी स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा रविवार, १५ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची, शिवकालीन वारशाची आणि पारंपरिक शस्त्रसंस्कृतीची ओळख नव्या पिढीला व्हावी,इतिहासाला उजाळा मिळावा या उद्देशाने सायंकाळी ६ वाजता शिवकालीन वारसा व शस्त्र प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शिवकालीन वारसा, पारंपरिक शस्त्रे आणि त्यांचे ऐतिहासिक महत्त्व नागरिकांना जवळून पाहता व जाणून घेता येणार आहे.

विद्यार्थी, युवक, महिला, ग्रामस्थ तसेच इतिहासप्रेमींसाठी हे प्रदर्शन विशेष आकर्षण ठरणार असून, नव्या पिढीमध्ये इतिहासाविषयी कुतूहल, जागृती आणि अभिमान निर्माण व्हावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

यानंतर रात्री ठीक ८ वाजता किल्ले बांधणी स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा, विजेत्या संघांचा गौरव करण्यात येणार असून सर्व सहभागी संघांना सहभाग प्रमाणपत्रे प्रदान केली जाणार आहे. कै नारायण (नाना ) येसो वर्णेकर, रंगमंच,श्रीं सती देवी मंदिर मांडवफातर वाडी, ओटवणे येथे होणाऱ्या या सोहळ्यास सर्व ग्रामस्थ, विद्यार्थी, युवक, महिला आणि इतिहासप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.