नकाशे जीर्ण झाल्याने माजगावचे शेतकरी शासकीय नुकसान भरपाईपासून वंचित

२५ जूनपासून सावंतवाडी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा

सावंतवाडी : तालुक्यातील  माजगाव येथील खातेदार शेतकऱ्यांचे जमिनीचे नकाशे जीर्ण झाल्याचे कारण पुढे करून ते देण्यास टाळाटाळ केली जात असल्यामुळे, संतप्त ग्रामस्थांनी आता थेट आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. भूमि अभिलेख कार्यालयाकडून मिळणाऱ्या उडवाउडवीच्या उत्तरांमुळे त्रस्त झालेल्या माजगावच्या ग्रामस्थांनी माजी पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण सावंत यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार, २५ जून रोजी सकाळी ११ वाजता सावंतवाडी तहसील कार्यालयासमोर जन आक्रोश आमरण उपोषण छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाल्यापासून माजगाव येथील भूमी अभिलेखांची ही दुरवस्था कायम आहे. शेतकऱ्यांनी सन २००० पासून सातत्याने या नकाशांची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, सन २००२ मध्ये शासनाच्या तत्कालीन ‘समाधान योजनेत’ देखील याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र, गेल्या २४ वर्षांत अनेक लेखी निवेदने देऊनही या समस्येत कोणतीही सुधारणा झालेली नाही. प्रशासकीय अनास्थेचा हा फटका येथील पिढ्यानपिढ्या शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना बसत आहे.

*नकाशांअभावी नुकसान भरपाई मिळेना*

माजगाव येथील शेतकरी पारंपरिक शेती व शेतीपूरक व्यवसाय करतात. मात्र, गेल्या काही वर्षांत अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, वन्य प्राण्यांचा सुळसुळाट आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शासन अशा नुकसानीपोटी भरपाई जाहीर करते आणि गाव तलाठी, ग्रामपंचायत अधिकारी व कृषी सहाय्यक यांच्यामार्फत प्रस्ताव मागवले जातात. परंतु, या प्रस्तावांना मंजुरी मिळण्यासाठी जमिनीच्या नकाशाची प्रत जोडणे अनिवार्य असते.

जेव्हा शेतकरी सावंतवाडी भूमी अभिलेख कार्यालयात नकाशा मागण्यासाठी जातात, तेव्हा “रेकॉर्ड उपलब्ध नाही” किंवा “नकाशे फाटलेले व जीर्ण झाले आहेत” अशी साचेबद्ध उत्तरे दिली जातात. वारंवार कार्यालयाचे हेलपाटे मारून शेतकरी शेवटी हताश होतात आणि मुख्य कागदपत्र (नकाशा) नसल्यामुळे त्यांना हक्काच्या शासकीय नुकसान भरपाईला मुकावे लागते.

*कर्मचाऱ्यांची खोडसाळ भाषा आणि उडवाउडवीची उत्तरे*

शेतकरी जेव्हा आपल्या हक्काच्या नकाशासाठी कार्यालयात विचारणा करतात, तेव्हा तिथले कर्मचारी अत्यंत बेजबाबदारपणे वागतात. “अधिकारी मोजणीसाठी गेले आहेत” किंवा “नकाशे उपलब्ध नाहीत” अशी उडवाउडवीची व खोडसाळ भाषा वापरून शेतकऱ्यांना पिटाळून लावले जाते, असा आरोप श्रीकृष्ण सावंत यांनी केला आहे. प्रशासकीय दिरंगाईमुळे हक्काच्या पैशांपासून वंचित राहिलेल्या माजगावच्या शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, “आमच्या या नुकसानीला जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.

या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेत, प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी माजी पं. स. सदस्य श्रीकृष्ण सावंत आणि माजगावच्या खातेदार ग्रामस्थांनी गुरुवार २५ जून रोजी सकाळी ११ वाजल्यापासून आमरण उपोषणाला बसण्याचा ठाम निर्धार केला आहे. या आंदोलनामुळे सावंतवाडी तालुक्यात खळबळ उडाली असून, प्रशासन आता तरी जागे होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.