दिवाळीत चिमुकल्यांनी उभारले शिवशाहीचे वैभव; युवासेना मंडणगडच्या किल्ले सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद किल्ले सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात

जिल्हा परिषद शाळा कुंबळेने पटकाविला प्रथम क्रमांक; बालचिमुकल्यांच्या शिवप्रेमाला मान्यवरांची दाद

मंडणगड प्रतिनिधी,  : महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री तथा दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांच्या संकल्पनेतून युवासेना मंडणगड यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या किल्ले सजावट स्पर्धा २०२६ चा बक्षीस वितरण सोहळा १२ नोव्हेंबर २०२६ रोजी पंतायत समिती मंडणगड येथ मोठ्या उत्साहात पार पडला. रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. अस्मिता केंद्रे आणि जिल्हा परिषद सदस्य प्रताप घोसाळकर यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. तालुक्यातील लहान मुलांनी या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्पर्धकांनी आपल्या कल्पकतेचा, कलागुणांचा आणि मेहनतीचा उपयोग करून ऐतिहासिक गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती अत्यंत आकर्षक पद्धतीने साकारल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास, स्वराज्याची संकल्पना आणि गड-किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे हा या स्पर्धेमागील प्रमुख उद्देश होता.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक जिल्हा परिषद शाळा कुंबळे, द्वितीय क्रमांक कु. रविराज गोरीवाले व ग्रुप, दुर्गवाडी-मंडणगड, तर तृतीय क्रमांक कु. रितेश विवेक वाडकर, शेनाळे यांनी पटकाविला. विजेत्यांसह सहभागी स्पर्धकांनाही मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य अनिल रटाटे, विभागप्रमुख इरफान बुरोंडकर, युवतीसेना तालुकाध्यक्षा सौ. प्रमिला किंजळे , युवासेना जिल्हा सचिव गणेश बिल्लार, युवासेना तालुकाध्यक्ष विकास पवार, युवासेना तालुका सचिव धिरज श्रीधर कदम, सल्लागार नागेश घोसाळकर, वसीमभाई चिपोलकर यांच्यासह शिवसैनिक, युवासैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेच्या माध्यमातून बालवयातच मुलांमध्ये शिवइतिहासाची आवड, गडकिल्ल्यांविषयी अभिमान आणि ऐतिहासिक वारसा जतन करण्याची जाणीव निर्माण होत असल्याचे या उपक्रमातून दिसून आले. फोटो ओळी – विजत्यांचा गौरव करताना जि.प.अध्यक्षा अस्मिता केंद्रे व मान्यवर