महावितरण रत्नागिरी परिमंडल कार्यालयात आंतरराष्ट्रीय लेखा दिवस उत्साहात साजरा

रत्नागिरी : महावितरणच्या रत्नागिरी परिमंडल कार्यालयात आंतरराष्ट्रीय लेखा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने लेखा विभागाचे महत्त्व आणि कंपनीच्या प्रगतीतील योगदान अधोरेखित करण्यात आले. या कार्यक्रमाला अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव, कार्यकारी अभियंते जितेंद्र माने, जितेंद्र फुलपगारे, वरिष्ठ व्यवस्थापक (विवले) मिलिंद कानडे उपस्थित होते. तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून अभिजीत सरदेसाई व प्रिया थेटे उपस्थित होते.

यावेळी बोलताना अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव म्हणाले, ‘कंपनीच्या प्रत्येक विभागाच्या कामकाजात लेखा विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असते. कंपनीच्या आर्थिक व्यवहारांचे अचूक व्यवस्थापन, खर्चावर नियंत्रण, आर्थिक नियोजन आणि नियमांचे काटेकोर पालन यासाठी लेखा विभागाची जबाबदारी महत्त्वाची आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याने आपले काम अचूकतेने, प्रामाणिकपणे आणि पारदर्शकतेने केल्यास कंपनीच्या आर्थिक शिस्तीला बळकटी मिळेल आणि पर्यायाने कंपनीच्या प्रगतीला हातभार लागेल.’

कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक अभिजीत सरदेसाई यांनी गुंतवणुकीचे महत्त्व विशद करत आर्थिक नियोजनाबाबत माहिती दिली. तसेच आर्थिक साक्षरता, भविष्यातील आर्थिक गरजा, कुटुंबाचे आर्थिक संरक्षण आणि दैनंदिन जीवनातील जीवन विम्याचे महत्त्व याबाबत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रिया थेटे यांनीही आर्थिक नियोजन आणि गुंतवणुकीच्या योग्य पर्यायांची निवड करताना आर्थिक उद्दिष्टे, जोखीम क्षमता आणि भविष्यातील गरजा यांचा विचार करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपव्यवस्थापक (मांस) बाळकृष्ण झोरे यांनी केले. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहभागामुळे हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला