डिजिटल बँकिंग, क्यूआर कोड वाटप व विमा योजनांची दिली जाणार माहिती
राजापूर प्रतिनिधी राजापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, राजापूरच्या साखरी नाटे शाखेच्या वतीने शनिवार, दि. १४ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता ग्राहक व व्यापारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नाटे नगर विद्यामंदिर, नाटे येथे हा मेळावा होणार आहे.
बँकेच्या ग्राहकांना तसेच व्यापारी बांधवांना अधिक सुलभ, जलद आणि आधुनिक बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आधुनिक डिजिटल बँकिंग सुविधांची माहिती, नवीन क्यूआर कोडचे वाटप, इन्शुरन्स पॉलिसीविषयी मार्गदर्शन तसेच बँकेच्या विविध सुविधांची सविस्तर माहिती उपस्थितांना देण्यात येणार आहे. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासह ग्राहक आणि बँक यांच्यातील संवाद अधिक दृढ करण्याचा या मेळाव्याचा प्रयत्न आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राजापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष अॅड. शशिकांत सुतार भूषविणार आहेत. प्रमुख उपस्थितांमध्ये व्यापारी संघ नाटेचे अध्यक्ष रमेश लांजेकर, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अमजद बोरकर, नाटे ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप बांदकर, साखरी नाटे ग्रामपंचायतीचे सरपंच गुलजार ठाकूर आणि साखरी नाटे मच्छीमार सहकारी सोसायटीचे अध्यक्ष शफी वाडकर यांचा समावेश आहे. राजापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक यंदा आपल्या १०६ व्या वर्षात पदार्पण करत असून, ग्राहकांचा विश्वास आणि सहकार्याच्या बळावर बँकेने सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेला ग्राहक व व्यापारी मेळावा ग्राहकांना आधुनिक बँकिंग सेवांची माहिती करून देणारा आणि बँक व ग्राहक यांच्यातील नातेसंबंध अधिक दृढ करणारा ठरणार आहे.
या मेळाव्याला साखरी नाटे परिसरातील ग्राहक, व्यापारी बांधव आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बँकेचे उपाध्यक्ष विवेक गाडेकर, व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष अनिलकुमार करंगुटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे यांनी केले आहे.













