भाजपा पदाधिकारी-कार्यकर्त्यांसाठी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या निवासस्थानी दिवाळी फराळाचे आयोजन

चिपळूण (प्रतिनिधी) : दीपावली सणाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या वतीने गुरुवार दि. १२ रोजी त्यांच्या खेर्डी येथील ‘स्वामिनी’ निवासस्थानी चिपळूण तालुक्यातील भाजप पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांसाठी दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशांत यादव आणि भाजपाच्या जिल्हा विशेष निमंत्रित सदस्य तसेच वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांनी सर्वांचे आपुलकीने स्वागत केले. दिवाळी हा सण केवळ दीपोत्सवाचा नसून नात्यांमधील जिव्हाळा, स्नेह आणि आपुलकी अधिक दृढ करणारा सण आहे. याच भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या स्नेहमेळाव्यात उपस्थितांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच पक्षातील सहकारी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये अनौपचारिक संवादातून विचारांची देवाणघेवाण झाली. राजकीय आणि सामाजिक कार्याच्या व्यस्त दिनक्रमातून काही क्षण एकत्र येत आनंदाने घालवण्याची संधी या निमित्ताने सर्वांना मिळाली. पक्षसंघटनेची ताकद ही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधील एकजूट, परस्पर विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्यांमध्ये असते. हीच एकजूट अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने अशा स्नेहमेळाव्यांना विशेष महत्त्व आहे.
प्रशांत यादव यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या दिवाळी फराळाच्या कार्यक्रमाने कार्यकर्त्यांमधील स्नेहबंध अधिक दृढ केले. स्नेह, आनंद, आपुलकी आणि उत्साहाच्या वातावरणात हा दिवाळी फराळाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.