ACCIDENT BREAKING : मार्लेश्वर देवस्थान येथे मोठी दुर्घटना; डोंगरावरून दगड पडून ६ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

अन्य दोघेजण जखमी; सांगलीतील कुटुंबावर काळाचा घाला

निलेश जाधव / देवरूख

राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील मारळ येथील स्वयंभू श्री मार्लेश्वर देवस्थान येथे आज शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. देवस्थान परिसरातील डोंगरावरून अचानक दगड डोक्यात पडल्याने ६ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला, तर अन्य दोघेजण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून भाविकांमध्ये शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सांगलीहून ८ जण शुक्रवारी मार्लेश्वर दर्शनासाठी आले होते. मार्लेश्वर दर्शन व धबधब्याचा आनंद लुटून माघारी परतत असताना देवस्थान परिसरातील डोंगरावरून अचानक तीन ते चार दगड खाली कोसळले. त्यातील एक दगड सहा वर्षीय मुलीच्या डोक्यात पडला यात ती गंभीर जखमी झाली. या दुर्घटनेत अन्य दोघेजणही जखमी झाले. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जखमींना उपचारासाठी देवरूख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी डाँक्टरांनी मुलीला तपासून मृत घोषित केले. दरम्यान, या दुर्घघटनेत निष्पाप चिमुकलीचा मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आनंदाने देवदर्शनासाठी आलेल्या कुटुंबावर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेमुळे मार्लेश्वर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी देवस्थान कमिटीने भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.