# देवगडमध्ये राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेचे सहावे वर्ष; महाराष्ट्रातील ३४ कलाकारांचा सहभाग
### २४ तास चालणार रांगोळी निर्मितीचा उपक्रम; यंदा १९९० पूर्वीच्या हाताने रंगविलेल्या चित्रपट पोस्टर्सची संकल्पना
### १५ व १६ नोव्हेंबर रोजी नागरिकांसाठी रांगोळी प्रदर्शन खुले; लहान मुलांसह कलारसिकांनी भेट देण्याचे आवाहन
देवगड : प्रतिनिधी
युथ फोरम देवगड आयोजित भव्य राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा व प्रदर्शनाचे यंदा सहावे वर्ष असून, यानिमित्त महाराष्ट्राच्या विविध भागांतून ३४ रांगोळी कलाकार देवगडमध्ये दाखल झाले आहेत. यंदाच्या स्पर्धेसाठी ‘मुव्ही पोस्टर’ ही आगळीवेगळी संकल्पना निवडण्यात आली आहे. १९९० पूर्वी चित्रपटांची पोस्टर्स हाताने रंगविली जात असत. त्या जुन्या कलापरंपरेची आठवण करून देणारी चित्रपट पोस्टर्स कलाकार रांगोळीच्या माध्यमातून साकारत आहेत. याबाबतची माहिती युथ फोरमचे अध्यक्ष सिद्धेश माणगावकर व उपाध्यक्ष प्रणव नलावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली
१३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरू झालेली ही स्पर्धा १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत सलग २४ तास चालणार आहे. त्यानंतर तयार झालेल्या रांगोळ्यांचे प्रदर्शन १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून सुरू होणार असून, १५ व १६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्व नागरिकांसाठी खुले राहणार आहे.
देवगडमधील बर्वे लायब्ररी येथे पूर्वी संस्कार भारतीच्या माध्यमातून रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या जात असत. रांगोळी ही आपली पारंपरिक कला असून तिचे जतन आणि संवर्धन व्हावे, या उद्देशाने युथ फोरमने या स्पर्धेची सुरुवात केली. सुरुवातीला स्थानिक पातळीवर सुरू झालेल्या या स्पर्धेला आज राज्यस्तरीय स्वरूप प्राप्त झाले आहे. संजय जोरी, अमृत शहा आणि मधुकर नलावडे यांसारख्या कलाकारांच्या कलेतून प्रेरणा घेत या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती.
यंदाच्या स्पर्धेत रत्नागिरी, गोवा, कोल्हापूर, मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती, परभणी, मालेगाव, गोंदिया, हिंगणघाट यांसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला, कणकवली आणि देवगड येथील कलाकार सहभागी झाले आहेत. यामध्ये देवगडमधील तीन कलाकारांचा समावेश आहे. दरवर्षी स्पर्धेचा दर्जा आणि संकल्पना अधिक दर्जेदार करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे आयोजकांनी सांगितले.
स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी १५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकासाठी १२ हजार रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी १० हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह दिले जाणार आहे. तसेच दोन उत्तेजनार्थ पारितोषिकांसाठी प्रत्येकी ५ हजार रुपये व सन्मानचिन्ह देण्यात येणार असून, सर्व सहभागी कलाकारांना आकर्षक फ्रेम केलेले सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
हे पारितोषिक म्हणजे कलाकारांच्या कलेचा सन्मान करण्यासाठी दिलेले प्रोत्साहनपर मानधन आहे. कलाकार २४ तास कोणत्याही विश्रांतीशिवाय, गर्दी आणि उष्णतेमध्ये आपली कलाकृती साकारत असतात. केवळ पारितोषिकासाठी नव्हे, तर कलेची आवड आणि कलेची भूक त्यांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रेरित करते, असे आयोजकांनी स्पष्ट केले.
देवगडमधील नागरिकांनी तसेच जिल्ह्यातील कला रसिकांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी. विशेषतः पालकांनी आपल्या लहान मुलांनाही सोबत आणून ही कला दाखवावी. त्यामुळे कलाकारांना प्रोत्साहन मिळण्याबरोबरच नव्या पिढीमध्येही पारंपरिक कलेविषयी आवड निर्माण होईल. स्पर्धा पाहण्यासाठी आणि कलाकारांच्या कलेचा आस्वाद घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन युथ फोरम देवगडचे अध्यक्ष सिद्धेश माणगावकर व उपाध्यक्ष प्रणव नलावडे यांनी पत्रकार परिषदेत केले.
यावेळी ओमकार सारंग, सोहम पारकर, सागर गावकर यांच्यासह युथ फोरमचे अन्य सदस्य उपस्थित होते.













