राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वावं देणारे : प्रा प्रभात कोकजे

गौरव पोंक्षे माखजन :
शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञानाचे संचित नसून, व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासाचे सामर्थ्य आहे आणि याच विचाराचा नवा आविष्कार म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आहे.राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वावं देणारे असल्याचे मत प्रा प्रभात कोकजे यांनी व्यक्त केले.ते रत्नागिरी च्या पटवर्धन हायस्कुल व ज्युनिअर कॉलजे येथे सुरु असलेल्या वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षणात मार्गदर्शन करताना बोलत होते.ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -२०२० व नवीन अभ्यासक्रम परिचय,ओळख,व वैशिष्ट्ये या विषयावर बोलत होते.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे तर्फे संपूर्ण राज्यात वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण सुरु आहे.यामध्ये जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था रत्नागिरी तर्फे या प्रशिक्षणाचे आयोजन रत्नागिरी च्या पटवर्धन हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज येथे करण्यात आले आहे.डाएट चे प्राचार्य डॉ.सुशीलकुमार शिवलकर,अधिव्याख्याता राहुल बर्वे,राजेंद्र लठ्ठे यांच्या मार्गदर्शनात हे प्रशिक्षण सुरु आहे.
प्रा कोकजे पुढे म्हणाले की,आज आपण विद्यार्थ्यांना जे शिक्षण देऊ, त्यावर उद्याच्या भारताचे भविष्य अवलंबून आहे. म्हणूनच शिक्षणातील परिवर्तन ही केवळ गरज नाही, तर राष्ट्रनिर्मितीची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.परीक्षेतील गुण विद्यार्थ्यांची गुणवत्ता ठरवू शकत नाहीत; कारण प्रत्येक विद्यार्थ्याच्या यशाची व्याख्या वेगळी असते.भविष्यातील भारताची उंची आजच्या वर्गखोलीतून ठरणार आहे आणि त्या वर्गखोलीचे शिल्पकार आपण शिक्षक आहोत असे सांगत शिक्षकांना भविष्यातील आवाहनांची जाणीव करून दिली.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची यशस्वीता कागदावरील तरतुदींमध्ये नसून, त्या वर्गखोलीत अध्यापनाने किती प्रभावीपणे उतरतात यामध्ये असल्याचे नमूद केले.
या प्रशिक्षणात प्रा.प्रभात कोकजे यांच्यासह प्रा सौ मानसी गानू, प्रा सागर पोकळे,श्री एस एस पडवेकर,श्री एम बी बापट,श्रीम.ए जे काणे,श्रीम.एस.व्ही चिले,श्रीम.एस आर बोडेकर, आदी प्रशिक्षकाचे काम करत आहेत.
या प्रशिक्षणाला प्रा राहुल यादव,प्रा अमोल धुलप ,प्रा सुयोग तांबे,ओंकार नामजोशी,महादेव शिंदे,एन.एस.बांदार,प्रा दत्तप्रसाद सिनकर,प्रा सौ भाग्यदेवी चोगले आदिंसह मोठ्याप्रमाणात शिक्षक वर्ग उपस्थित आहे.हे प्रशिक्षण १३ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर या कालावधीत सकाळी ९ ते ५.३० या वेळेत होणार आहे.